फोटो सौजन्य - सोशल मीडिया
सासवड : सासवडमध्ये वारकऱ्यांबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. सासवडमध्ये दाखल झालेल्या वारकऱ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुढील प्रवासासाठी निघाल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दिंडी क्रमांक 245 येथे 40 जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.
सासवडमध्ये एकाच दिंडीतील जवळपास 40 वारकऱ्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले. याबाबत 108 क्रमांकावर माहिती मिळाली. ही माहिती मिळताच यंत्रणा तात्काळ कामाला लागली. दांडी थांबलेल्या कातोबा महाविद्यालय दिवे येथील डॉक्टरांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली. प्रथमोपचार करून रुग्णांना पुढील उपचाराकरिता सासवड ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. 108 रुग्णवाहिकेवरील डॉक्टर रमेश साळवे, डॉक्टर गायकवाड, डॉक्टर स्वप्नाली जेंगटे, वाहन चालक संदीप एरंडकर, वाहन चालक पारधी, वाहन चालक सुनील जाधव यांनी घटनास्थळी तात्काळ पोहोचून रुग्णांना, प्रथमोपचार देऊन सासवड ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. सध्या वारकऱ्यांवर पुढील उपचार सुरु आहेत.