(File Photo : Food Poison)
गडचिरोली : रेखेगाव-अनंतपूर शाळेतील जवळपास 41 विद्यार्थ्यांना मंगळवारी (दि.१२) विषबाधा झाली. यामध्ये ३१ विद्यार्थ्यांना चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात व १० विद्यार्थ्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, हा प्रकार नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. अन्न व पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सध्या सर्वच विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. चामोर्शी तालुक्यातील अनंतपूर येथील स्व. सूरजमल चव्हाण आश्रमशाळा व स्व. सुधाकर नाईक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तसेच वसंतराव नाईक आश्रमशाळा या तिन्ही शाळेतील पहिली ते बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना त्रास झाला.
सोमवारी सायंकाळच्या सुमारास ताप, मळमळ, चक्कर, उलटी, सर्दी, खोकला असे जाणवू लागले. तेव्हा त्यापैकी १६ विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या आमगाव महाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सायंकाळच्या सुमारास दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ७ विद्यार्थ्यांना रात्री ९.३० वाजताच्या सुमारास चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती रात्रीच मिळाली. त्यावर मी लक्ष ठेऊन आहे. मात्र, नुकतेच आरोग्य विभागाकडून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झाली होती. त्यावेळी त्यांना गोळ्या देण्यात आल्या. त्याचे सेवन केल्याने व सध्या वातावरणातील व्हायरलने बाधा होऊ शकते, असे गोवर्धन चव्हाण यांनी सांगितले.
10 विद्यार्थ्यांना दाखल केलं जिल्हा रुग्णालयात
दरम्यान, ४१ विद्यार्थ्यांपैकी १० विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात अश्विता दुर्गम (१६), सानवी पानीक (१०), सिंदुजा कोटाला (१०), वैशाली चौधरी (१६), रजनिका धारावत (१५), वसुंधरा निलम (१०), दीक्षा झोडे (११), वैशाली दुर्गम (१०), अर्चना निलम (१८). विनयकुमार तुकूम (११) यांचा समावेश आहे.
सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर
सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. नेमके विद्यार्थ्यांना कशाच्या माध्यमातून विषबाधा झाली याचे कारण कळू शकले नाही. संबंधित वैद्यकीय अधिकारयांमार्फत त्यादृष्टीने विद्यार्थ्यांची तपासणी सुरु आहे.