ठाणे/ स्नेहा जाधव काकडे : राज्यात गणेशोत्सव मोठ्या धामधूममध्ये साजरा केला जात आहे. याचपार्श्वभूमीवर राज्यात आज गौरी गणपतींना निरोप देण्यात येत आहे. जिल्ह्यात 34 हजार गणेशमूर्ती आणि 15 हजार गौरी मूर्तीचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात करण्यात येणार आहे. यात 173 सार्वजनिक गणेश मूर्ती तर 34 हजार 294 घरगुती गणेशमूर्तीचा समावेश असणार आहे. या वर्षी गौरी आगमनाची तारीख उशिरा आल्यामुळे सात दिवसांच्या गणेशोत्सवासोबतच गौरींचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे ठाण्यातील विसर्जन सोहळा अधिक उत्साहात पार पडणार आहे.
साधारणपणे गौरींचे आगमन गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी होते आणि दोन दिवसांच्या पूजनानंतर त्या निरोप घेतात. मात्र, यंदा पंचांगानुसार गौरी आगमनाची तारीख उशिरा आली. यावर्षी गौरींचे गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी आगमन झाले आहे. त्यामुळे यंदा सात दिवसांच्या गणपतीसोबतच गौरीपूजनाचे दिवस आले आहेत. म्हणून सात दिवसांचे गणपती आणि गौरींचे विसर्जन एकाच दिवशी पार पडणार आहे.
पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करून ढोल-ताशांच्या गजरात, “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा घोषणा देत. तसेच ढोलताशाच्या गजरात, गुलालाची उधळण करीत, पारंपारिक वेशभूषेत भाविक मूर्ती विसर्जनासाठी नेणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा 23 कृत्रिम तलाव, 77टाकी विसर्जन व्यवस्था, 15 फिरती विसर्जन केंद्र, 9 खाडी घाट विसर्जन व्यवस्था आणि 90 मूर्ती स्वीकृती केंद्र अशा एकूण 134 ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गजरात भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला आज निरोप देणार आहेत.
ठाणे जिल्ह्यात भाद्रपद गणेश चतुर्थी निमित्ताने दीड लाखाहून अधिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना झालेली. यामध्ये 1 लाख 56 हजार 782 घरगुती आणि 1 हजार 60सार्वजनिक गणेशमूर्तीचा सामावेश होता. सर्वाधिक सार्वजनिक गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा ठाणे शहरात झाली तर सर्वाधिक घरगुती गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा उल्हासनगर ते बदलापूर या भागात झाली होती .यंदा 1 लाख 56 हजार 782 घरगुती आणि 1 हजार 60 सार्वजनिक असे एकूण 1 लाख 57 हजार 842 गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली होती.