निमसाखर : जंक्शन (ता. इंदापूर) येथील वृद्ध जोडप्याच्या गाडीचा ब्रेक निकामी झाला. ही बाब वेळीच लक्षात आल्याने संबंधित वृद्धाने आरडाओरड करत याची माहिती दिली. त्यावेळी प्रसंगावधान राखत रियाज नावाच्या एका मुलाने क्षणाचाही विलंब न करता दुचाकी थांबवल्याने वृध्द दाम्पत्याचा जीव भांड्यात पडला. काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती, असाच काहीसा अनुभव आल्याचे यातून दिसत आहे.
रियाज मुलाणी असे या धाडसी युवकाचे नाव असून, जंक्शन (ता. इंदापूर) येथील रहिवाशी आहे. अवघ्या १७ वर्षांचा असलेला रियाज मुक्त विद्यापीठातून ११ वीच्या वर्गात शिकत आहे. मंगळवारी (दि. २२) नेहमीप्रमाणे रियाज घरातील कामकाजामध्ये कुटुंबियांना मदत करत होता. यावेळी घराच्या समोरील रस्त्यावरून एक वृद्ध दाम्पत्य टीव्हीएस लुना या दुचाकीवरून ओरडत येत असल्याचे त्याला दिसले. ‘गाडीचे ब्रेक लागत नाहीत, आम्हाला वाचवा’, अशी आर्त विनवणी ते जोडपे करत असल्याचे रियाजच्या निदर्शनास आले.
वेगात असणारी दुचाकी थांबवायची कशी? असा विचार सुरुवातीला रियाजच्या मनात आला. मात्र, दुचाकीच्या मागे पळत रियाज याने दुचाकीचे कॅरेज घट्ट धरले. दुचाकी थांबवली. रियाजच्या या प्रसंगावधानामुळे हे वृद्ध दाम्पत्य सुखरूप बचावले. जर ही दुचाकी थांबली नसती तर समोरील इंदापूर-बारामती राज्य महामार्गावर गेली असती. मात्र, रियाजने दाखवलेल्या धाडसामुळे पुढील अनर्थ टळला.
या प्रसंगातून बचावलेल्या वृद्ध दाम्पत्याने देखील ‘बरे झाले लेकरा तू होतास म्हणून आम्ही वाचलो’ अशा शब्दांत रियाजचे आभार मानले. हा सर्व प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, रियाजच्या या धाडसाचे व प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामस्थांच्या वतीने रियाजचा सत्कार करण्यात आला.
मी घराच्या बाहेर साफसफाई करत होतो. एवढ्यात समोरून मला दुचाकीवरून वृद्ध जोडपे येताना दिसले. गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत, असे ते सांगत होते. मला त्या क्षणी जे सुचले ते मी केले. पळत जाऊन गाडीचे कॅरेज मागून घट्ट धरले व गाडी थांबवली.
– रियाज मुलाणी