पुणे : कौटुंबिक हिंसाचाराच्या दाखल गुन्ह्यातील दोषारोपपत्रात मदत करण्यासाठी व तक्रारदारांच्या आई वडीलांना अटक न करण्यासाठी तब्बल ५० हजारांची लाच मागणार्या शहर पोलीस दलातील महिला सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीच्या या कारवाईनंतर दोघेही फरार झाले आहे.
सहायक पोलिस निरीक्षक हर्षदा बाळासाहेब दगडे व पोलिस शिपाई अभिजीत विठ्ठल पालके यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २७ वर्षीय तरूणाने एसीबीकडे याबाबत तक्रार केली होती. हर्षदा दगडे या कोंढवा पोलिस ठाण्यात कर्तव्यास आहेत. तर, अभिजीत पालकेही कोंढव्यात नेमणूकीस आहे.
तक्रारदार तरुण व त्याच्या कुटूंबावर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्याचा तपास दगडे करत असून, गुन्ह्यातील दोषारोपपत्रात मदत करण्यासाठी व त्यांच्या आई, वडील तसेच बहीणीला अटक न करण्यासाठी त्यांनी या तरुणाकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यावेळी तरुणाने एसीबीकडे याबाबत तक्रार केली. एसीबीकडून त्याची (दि. २८ सप्टेंबर) तक्रारीची पडताळणी केली. त्यात लाच मागताना आढळून आले. त्यामुळे एसीबीच्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच दोघेही फरार झाले.