सोलापूर येथील फताटेवाडी ग्रामपंचायतीत तब्बल 4.42 कोटींचा अपहार; सरपंच, उपसरपंचासह ग्रामसेवकांवर गुन्हा
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडीचे सरपंच हरिशचंद्र राठोड, उपसरपंच आर. व्ही. जाधव व ग्रामसेवक बी. डी. पाटील यांच्यावर 4 कोटी 42 लाख 91 हजार 993 रूपयांचा अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. वळसंग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फताटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक अपहरण झाल्याप्रकरणी फताटेवाडी येथील विनोद रमेश चव्हाण यांनी लोकआयुक्त व पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा परिषद बांधकाम विभाग दोनचे कार्यकारी अभियंता यांनी याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर केला. याप्रकरणी विस्तार अधिकारी सदाशिव भिमशा कोळी यांनी फिर्याद दिली आहे. फताटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये १ एप्रिल २०२३ ते १५ ऑक्टोबर २०२४ अखेर आर्थिक अपहर झाला.
विशेषतः तांत्रिक मान्यता व मोजमाप नोंदवहीमध्ये मूल्याकंनापूर्वी खर्च करणे, एकाच कामावर दोन वेळा खर्च करणे, एकाच कामाचे दुबार मूल्याकंन नोंदविणे, मूल्याकंनापूर्वी खर्च करणे, रोखीने खर्च, एकाच कामासाठी २ यंत्रणा कार्यरत असणे, महाराष्ट्र ग्राम पंचायत लेखासंहिता नियम २०११ चे पालन न करणे, कर्मचारी वेतन व वैयक्तिक लाभाच्या योजनेबाबत प्रशासकीय व तांत्रिक मान्यता न घेणे यासह आरओ प्लॉट एटीएममधील रक्कम ग्रामपंचायत खात्यात जमा न करणे अशाप्रकारचा हा आर्थिक अपहार सरपंच, ग्रामसेवक व उपसरपंच यांच्या संगनमताने झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.