400 मीटरसाठी 18 हजार उकळले, 20 मिनिटं फिरवलं अन्...; अमेरिकन महिलेची मुंबईत फसवणूक
मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळच असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलपर्यंतच्या अवघ्या 400 मीटर अंतरासाठी एका टॅक्सी चालकाने महिलेकडून तब्बल 18 हजार रुपये उकळले. याप्रकरणी मुंबईतील सहार पोलिसांनी एका अमेरिकन महिला पर्यटकाची फसवणूक केल्याप्रकरणी कॅब चालकाला अटक केली आहे.
देशराज यादव (वय ५०) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेहून मुंबईत पोहोचलेल्या या महिलेने विमानतळावरून हॉटेलला जाण्यासाठी टॅक्सी घेतली होती. मात्र, चालकाने तिला थेट हॉटेलवर न नेता अंधेरी (पूर्व) परिसरात सुमारे 20 मिनिटे फिरवले. त्यानंतर त्याच भागात पुन्हा तिला हॉटेलसमोर सोडले. अर्जेंटिना एरिआनो या अमेरिकन महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपला हा कटू अनुभव शेअर केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आणि त्याला एक लाखांहून अधिक व्ह्यू मिळाले.
हेदेखील वाचा : ज्यादा परताव्याच्या आमिषाने दीड कोटींना गंडा; सायबर चोरट्यांनी फसवणूक केली अन् तेच पैसे…
दरम्यान, पोस्टमध्ये महिलेने टॅक्सीचा नोंदणी क्रमांकही शेअर केला होता, ज्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. पीडित महिलेशी थेट संपर्क होऊ न शकल्याने पोलिसांनी स्वतःहून दखल घेत गुन्हा दाखल केला आणि अवघ्या तीन तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या.
पोलिसांकडून जबाब नोंदवण्याचा प्रयत्न
तपासादरम्यान पोलिसांनी त्या हॉटेलमधून माहिती गोळा केली जिथे महिला थांबली होती. ती महिला दुसऱ्या दिवशी चेक-आउट करून पुण्याला गेली आणि तिथून अमेरिकेला रवाना झाली. महिलेने हॉटेल कर्मचाऱ्यांना या घटनेची कल्पना दिली नव्हती. पोलीस आता तिचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न करत आहेत.
साथीदाराचाही शोध सुरु
या प्रकरणात आरोपीच्या एका साथीदाराचा पोलिस शोध घेत आहेत. देशराज यादव सध्या पोलिस कोठडीत असून, त्याची टॅक्सी जप्त करण्यात आली आहे. आरोपीचा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यासाठी परिवहन विभागाला कळवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : गुंतवणुकीतून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 65 लाखांना गंडा; ‘ही’ पद्धत अवलंबत केली फसवणूक






