पीएम आवास योजनेत दुबार लाभ; राज्यात १,६७६ जणांची पडताळणी सुरू
छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या योजनांचा दुबार लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांवर कारवाईचे संकेत मिळाले आहेत. राज्यभरातील १६७६ लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून, त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील २९७ लाभार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या प्रकरणात संबंधित लाभार्थ्यांनी नंतर घेतलेल्या योजनेचे अनुदान शासनाच्या खात्यात जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. निर्धारित मुदतीत रक्कम न भरल्यास संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याबरोबरच महसूल नियमांनुसार मालमत्तेवर बोजा चढवण्याची कारवाई होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, केंद्राने देशभरात राबवलेल्या पडताळणी प्रक्रियेत ८०४७ दुबार लाभार्थी आढळून आले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील १६७६ प्रकरणांची तपासणी करण्याचे आदेश राज्य प्रशासनाला देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अंतिम कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांनी इतर योजनांचा लाभ घेतला असल्यास त्यांना यादीतून वगळण्याची तरतूद आहे. त्यानुसार संबंधित लाभार्थ्यांची पडताळणी, रिमांड प्रक्रिया आणि वसुलीची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू
दुबार लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना पंचायत समिती स्तरावर नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे. दिलेल्या मुदतीत अनुदानाची रक्कम परत न केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी दिली.
प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गतही अनुदान घेतल्याचे उघड
गृहनिर्माण विभागाचे संचालक डॉ. राजाराम दिघे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून तातडीने कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात २९७ लाभार्थ्यांनी दुबार लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले असून, त्यापैकी एकट्या नाशिक तालुक्यात २४६ लाभार्थी असल्याची माहिती आहे. ग्रामीण भागातील काही लाभार्थ्यांनी शहरात घरे घेतल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गतही अनुदान घेतल्याचे उघड झाले आहे.
हेदेखील वाचा : महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम ग्रामस्थांकडून बंद! समस्यांकडे दुर्लक्ष; भरतगाव, भरतगाववाडीच्या ग्रामस्थांतून संताप






