File Photo : Fire
दिग्रस : तालुक्यातील डोळंबा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील शालेय पोषण आहार शिजविण्याच्या खोलीत असलेल्या गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतला. या अचानक झालेल्या घटनेने एकच खळबळ उडाली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही घटना शाळेतच घडल्याने सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे.
हेदेखील वाचा : ‘त्या’ चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू; काहीही कारण नसतानाही झाला हल्ला
शनिवार आणि रविवारच्या शासकीय सुट्टीनंतर सोमवारी नित्यनेमाने शाळा उघडण्यात आली. शालेय पोषण आहार बनवण्यासाठी मदतनीस महिला कर्मचारी सदर खोलीत गेल्या असता गॅस सुरू करून स्वयंपाक करत होत्या. अचानक सिलिंडर गॅसने पेट घेतला. त्यामुळे आग लागली. खोलीत लागलेली आग एवढी भयावह होती की, उपस्थितांनी तेथून काढता पाय घेतला. मात्र, जागरूक नागरिकांनी सावधगिरी बाळगत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
निलेश जाधव यांनी तातडीने आर्णी नगर परिषद यांना घटनेची माहिती दिली. अग्निशमन दल पाचारण केले आणि कर्मचाऱ्यांनी आग विझवली. त्यामुळे होणारी संभाव्य हानी टळली. डोळंबा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 1 ली ते 7 वीचे अंदाजे 60 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
दरम्यान, या प्रकारामुळे विद्यार्थी घाबरून गेले होते. अक्षरशः त्यांना सुट्टी द्यावी लागली. संभाव्य हानी टाळण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीने या बाबीकडे जातीने लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली घटनास्थळाला भेट
डोळंबा येथील जिल्हा परिषद शाळेत आग लागल्याची माहिती मिळताच दिग्रस पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार यांनी क्षणाचा विलंब न करता लगेच घटनास्थळ गाठून भेट दिली. सोबत असलेल्या शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. यामधून शिक्षण विभागाची कार्यतत्परता दिसून आली.
हेदेखील वाचा : सुप्रीम कोर्टाने दिलेला अल्टिमेटम संपला, तरीही आरजी कार हॉस्पिटलचे डॉक्टर संपावर ठाम, आता पुढे काय?