Photo Credit- Social Media
बदलापूर: बदलापुरात आदर्श शाळेत झालेल्या चार वर्षांच्या दोन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर मंगळवारी मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या मांडला. सायंकाळच्या सुमारास झालेल्या गोंधळानंतर आज सकाळपासून बदलापुरात तणावपूर्ण शांतता आहे. शाळा,-महाविद्यालये बंद ठेवण्यात आले आहेत. इंटरनेट सेवा देखील बंद आहेत.
बदलापुरात तणावपूर्ण शांतता असून,पोलिसांनी संवेदनशील भागात बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. दगडफेक करणे,दंगल करून सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे आदी कलमांनुसार 300 पेक्षा जास्त आंदोलकांविरोधात रेल्वे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. बदलापूर अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर मंगळवारी संपूर्ण बदलापुरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. यातील काहीजणांनी थेट शाळेसमोर आंदोलन केले तर काहीजणांनी थेट रेल्वे स्थानकात घुसून रेलेरोको आंदोलन केले. सकाळपासून सांयकाळपर्यंत नागरिकांमध्ये संतप्त भावना होत्या.
हेदेखील वाचा: कोल्हापुरात भाजपच्या गडाला सुरूंग; बडा नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार
आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती. फाशी, फाशीची घोषणाबाजी करण्यात आली. तब्बल दहा तास हे रेल रोको आंदोलन सुरू होते. पण पोलिसांनी आंदोलन मोडण्याची भूमिका घेताच जमावही चांगलाच आक्रमक झाला. जमावानेही पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
दुपारी साडेतीनच्या सुमारास मंत्री गिरीश महाजनही आंदोलनस्थळी पोहचले, त्यांनीदेखील आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम होते. आम्हाल तुमचे 1500 रुपये नकोत आमच्या मुलांना सुरक्षा द्या, आमच्या मुलींना सुरक्षित वातावरण द्या, अशी मागणी आंदोलक महिलांकडून सुरू होती. बराच वेळ गिरीश महाजन आंदोलकांची समजूत काढत होते. पण पोलीस आणि गिरीश महाजन यांनाही आंदोलकांची समजूत काढण्यात अपयश आले. तब्बल 12 तास हे आंदोलन सुरू होते.
आंदोलन मागे थांबवण्यास आंदोलक तयार नसल्याचे दिसताच शेवटी आंदोलकाभोवती पोलीसबळ वाढवण्यात आले. आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न झाला. यात पोलिसांनी 300 हून अधिक आंदोलकांवर गुनेह दाखल करण्यात आले. 26 जणांना अटक करण्यात आली. आजही आंदोलन होऊ नये म्हणून पोलिसांनी बदलापुरात जमावबंदीचा आदेश देण्यात आला आहे.
हेदेखील वाचा: शाळेत चिमुकलींवर अत्याचार, आंदोलनाला हिंसक वळण
या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानेही या आंदोलनात उडी घेतली आहे. बदलापूर अत्याचाराच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी ठिकाठिकाणी आंदोलने होण्याची शक्यता आङे. त्यामुळे मुंबई पोलीसही अलर्ट मोडवर आली आहे. याशिवाय राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हेदेखील आज बदलापुरात दाखल होणार आहेत. ज्या शाळेत ही घटना घडली, त्या शाळेला भेट देण्याची शक्यता आहे. तर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यादेखील पीडित मुलांच्या कुटुंबियांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.