सौजन्य - नवराष्ट्र टीम
जत : भिवर्गी (ता. जत, जि. सांगली) येथे विवाहितेने दोन मुलासह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राजाक्का धर्मराय बिरादार (वय २८), मुलगा विष्णू बिराजदार (वय ५), माधुरी बिराजदार (वय २) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना शनिवारी दुपारी पांडोझरी ओढ्यावरील विहिरीत घडली. शनिवारी रात्री ८ वाजता हा प्रकार उघडकीस आला. उमदी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.
जत पूर्व भागातील भिवर्गी येथे बिळ्यानसिध्द मंदिराच्या पाठीमागे धर्मराय साताप्पा बिरादार हे आई, वडील, पत्नी, मुलासमवेत राहतात. धर्मराय बिराजदार यांचे ७ वर्षांपूर्वी माणिकनाळ (ता. जत) येथील राजाक्का हिच्याशी विवाह झाला. गावात धर्मराय बिराजदार यांचे दूध संकलन केंद्र आहे. एकुलता मुलगा आहे. घरी शनिवारी दुपारी राजाक्का या मुलगा विष्णू, मुलगी माधुरी यांना घेऊन घराबाहेर गेल्या.
दुपारनंतर घरात मुले नसल्याने शोधशोध घेतला. शेजारी, नातेवाईकांकडे चौकशी केली. परंतु सापडले नाहीत. ग्रामस्थांना ओढ्याजवळील सिध्दू करे यांच्या विहिरीशेजारी चप्पल आढळून आली. ग्रामस्थांना आत्महत्या केल्याचा संशय आला. सायंकाळी ६ वाजता पाण्यात कॅमेरा सोडून पाहिले. विहीरीत गाळ असल्याने दिसत नव्हते. कॅमेरा आणखीन तळाला सोडून पाहिले असता मृत राजाक्काचा हात दिसला. त्यामुळे खात्री पटली. पोलिस पाटील श्रीशैल चौगुले यांनी उमदी पोलिस ठाण्यात माहिती दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत.
सांगोल्याची रेस्क्यू टिम पाचारण
सायंकाळी उशिरा जनरेटर लावून पाण्याचा उपसा केला. परंतु पांडोझरी ओढ्याला पाणी असल्याने पाणी निघाले नाही. मृतदेह शोधण्यास अडथळे येत होते. शेवटी सांगोला येथील रेस्क्यू टिमला पाचारण करण्यात आले. रेसक्यू टिमने रविवारी दुपारी एक वाजता मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह उमदी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला.