फोटो सौजन्य - Social Media
खेड तालुक्यातील अलसुरे गावात रविवारी सायंकाळी गणेश विसर्जनाचा आनंदोत्सव काही क्षणातच शोकांतिका ठरला. जगबुडी नदीत गावातीलच मंगेश पाटील (वय ३५) हे युवक बुडून वारल्याने आनंदाचे वातावरण शोकमय झाले. दीड दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी गावकरी जल्लोषात एकत्र जमले होते. ढोल-ताशांचा गजर, “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात मिरवणूक सुरू असताना पाण्यात उतरल्यानंतर मंगेश पाटील हे खोल पाण्यात गेले व क्षणातच दुर्दैवी घटना घडली.
घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने आरडाओरड केली आणि बचावकार्य सुरू केले. माहिती मिळताच नगरपालिकेचे अग्निशामक दल, खेड रेस्क्यू टीम तसेच विसर्जन कट्टा पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस प्रशासनासह तहसीलदार, प्रांताधिकारी व उपविभागीय अधिकारी हेही तातडीने हजर झाले. शिवसेना उपनेते व माजी आमदार संजय कदम यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मोठ्या प्रमाणात मदतकार्य राबवण्यात आले, मात्र पाटील यांना वाचवता आलं नाही.
मृत मंगेश पाटील हे भोस्ते पाटीलवाडी येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी उरली आहे. दुर्दैव इतकं की त्यांच्या घरी यंदाच पहिल्यांदा नवसाचा गणपती बाप्पा विराजमान झाला होता. गणेशोत्सवाचा आनंद अजून ओसरलाच नव्हता आणि त्याच कुटुंबावर काळाचा घाला ओढवला. कुटुंबातील कर्ता पुरुष हिरावल्याने पत्नी व मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांनी सांगितलं की, “गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी सर्व गाव आनंदात जमले होते. पण काही क्षणातच घडलेल्या या घटनेने आम्हा सर्वांना हादरवून सोडलं.” परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून गावात शोककळा पसरली आहे.
गणेशोत्सव हा आनंद, ऐक्य आणि भक्तिभावाचा सण मानला जातो. पण विसर्जनाच्या वेळी घडलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे खेड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. बाप्पाच्या मंगलमय उत्सवावर दुःखाचे सावट पसरल्याने गावातील प्रत्येकजण स्तब्ध झाला आहे. या घटनेतून पुन्हा एकदा नदी, तलाव किंवा खोल पाण्यात विसर्जनाच्या वेळी दक्षतेची गरज अधोरेखित झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना काळजीपूर्वक पाण्यात उतरावे, सुरक्षेची साधने वापरावीत याचे आवाहन केले आहे.
मंगेश पाटील यांच्या निधनाने भोस्ते पाटीलवाडी व अलसुरे परिसर शोकाकुल झाला असून, गणपती विसर्जनातील ही शोकांतिका तालुक्याच्या स्मरणात दीर्घकाळ कोरली जाईल.