फोटो सौजन्य - Social Media
ठाणे शहरातील घनकचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घरोघरी कचरा संकलनाचे काम तत्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या सीपी तलाव येथील कचऱ्याचे आतकोली येथील क्षेपणभूमीवर हस्तांतरण सुरू असून, त्याच वेगाने घरगुती कचरा संकलनाची प्रक्रिया राबवण्यावर भर देण्यात आला आहे. बुधवार, १२ मार्चपासून, ठाण्यातील सीपी टँक येथे साचलेला कचरा २४ तास आणि तीन सत्रांमध्ये उचलला जात आहे. सुमारे ९० वाहने दररोज कचरा आतकोली येथे घेऊन जात असून, आतापर्यंत सुमारे सात हजार मेट्रिक टन कचरा हस्तांतरित करण्यात आला आहे. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरू नये म्हणून आतकोली येथे सुगंध फवारणी केली जात असून, मातीचा थर देण्याचे कामही शास्त्रोक्त पद्धतीने केले जात आहे.
रविवारी सायंकाळी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सीपी टँक येथील कचरा हस्तांतरण प्रक्रियेची पाहणी केली. त्यांनी येथे साठलेला कचरा अधिक वेगाने आतकोली येथे नेण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेतला. या वेळी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मनीष जोशी, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शहरातील घनकचरा समस्या सोडवण्यासाठी अधिक कार्यक्षम आणि ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ठाणे शहरातील स्वच्छता कायम राखण्यासाठी प्रशासनाने अधिक नियोजनबद्ध पद्धतीने कचरा संकलन आणि विल्हेवाटीच्या प्रक्रियेला गती द्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या सीपी टँक येथे मोठ्या प्रमाणात कचरा हस्तांतरित करण्याचे काम सुरू असून, त्याचा वेग आणखी वाढवण्यात यावा, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांवर, सोसायट्यांच्या बाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा लवकरात लवकर उचलण्यात यावा, जेणेकरून नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
विशेषतः, नागरिकांनी आपल्या घरातील कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावा आणि महापालिकेच्या घंटागाड्यांचा नियमितपणे लाभ घ्यावा, यासाठी अधिक जनजागृती करण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी दिले आहेत. नागरिकांना कचरा विल्हेवाटीबाबत अधिक जागरूक करण्यासाठी, विविध मोहिमा हाती घेतल्या जाणार असून, त्यामध्ये कचरा व्यवस्थापनाविषयी माहिती देणाऱ्या प्रचार माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे. महापालिकेच्या घंटागाड्यांमार्फत घरगुती कचरा संकलनाची प्रक्रिया अधिक कार्यक्षम केली जावी, ज्या ठिकाणी ही सेवा अद्याप पोहोचलेली नाही, तेथे ती त्वरित कार्यान्वित करावी, असे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
ठाणे महापालिकेच्या या हालचालींमुळे शहरातील घनकचरा व्यवस्थापनात सकारात्मक सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. शहर स्वच्छ आणि आरोग्यदायी राहण्यासाठी प्रशासनाने केवळ कचरा संकलनावर भर न देता, त्याच्या योग्य विल्हेवाटीवरही विशेष लक्ष केंद्रित करावे, अशी नागरिकांचीही मागणी आहे. कचरा व्यवस्थापनाच्या या मोहिमेत ठाणेकरांनीही सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता, तो योग्य ठिकाणी टाकण्याची सवय अंगी बाळगल्यास शहर अधिक स्वच्छ आणि पर्यावरणपूरक राहू शकते. महापालिकेच्या या निर्णयामुळे ठाणे शहराला स्वच्छतेच्या दिशेने एक नवीन गती मिळण्याची शक्यता आहे.