पुण्यात औरंगजेब समजून जाळला बहाद्दूर शाह जफरचा फोटो ; ‘पतित पावन’च्या आंदोलनात प्रकार
लोकसभेत शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी जोर धरुन लागली आहे. हिंदुत्त्ववादी संघटना यासाठी आक्रमक झाल्या असून रस्त्यावर उतरत आहेत. मात्र, सरकारकडून अद्याप भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मात्र, औरंगजेबाचाचे उदात्तीकरण नको असे म्हणत कबर हटविण्याच्या मागणीसाठी संघटना रस्त्यावर उतरत आहेत. पुण्यात (Pune) आज पतित पावन संघटनेकडून करण्यात आलेल्या आंदोलनात औरंगजेब समजून बहाद्दूर शाह जफर यांचा फोटो जाळण्यात आला. ‘पतित पावन’च्या आंदोलनातील ही घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
“पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा निषेध करण्यासाठी पुण्यात आंदोलन केलं. मात्र, या आंदोलनादरम्यान आंदोलकांकडून मोठी गफलत घडली. आंदोलकांनी औरंगजेब समजून चक्क मुघल सम्राट बहाद्दूर शाह जफर यांच्या फोटोला चपलांचा हार घालून तो जाळला. या चुकीमुळे आता या आंदोलनाची चर्चा संपूर्ण शहरभर रंगली आहे. पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लाल महाल चौकात औरंगजेबविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. परकीय आक्रमक आणि क्रूर शासक असलेल्या औरंगजेबाचा उदो उदो करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. मात्र, आंदोलकांकडून मोठी चूक झाली आणि त्यांनी औरंगजेबऐवजी शेवटचा मुघल सम्राट बहाद्दूर शाह जफर याचा फोटो जाळण्यात आल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. अनेकजण यावरुन टीका करत आहेत. काहींनी आंदोलनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, तर काहींनी हा प्रकार अज्ञानातून झाल्याचे सांगितले.
दरम्यान, आमच्या कार्यकर्त्याने चुकून चुकीचा फोटो छापून आणला. आम्हाला औरंगजेबाच्या उदात्तीकरण करणाऱ्यांचा विरोध करायचा होता आणि औरंगजेबाचा फोटो जाळायचा होता, अस स्पष्टीकरण पतीत पावन संघटनेने दिलं आहे. तसेच, आपल्याकडून अनावधानाने ही चूक झाल्याचंही आंदोलकांनी मान्य केलं आहे.