उमरखेड : पोहरादेवीचे दर्शन आटोपून तेलंगणातील कुटुंब परतीच्या मार्गाने जात असताना नांदेडकडून उमरखेडकडे येणाऱ्या भरधाव महिंद्रा कारच्या धडकेत टाटा एसचा चुराडा झाला. या अपघातात अकरा भाविक गंभीर जखमी झाले. ही घटना नागपूर-तुळजापूर रोडवरील शहरालगतच्या बायपासवर सायंकाळी सातच्या सुमारास घडली.
चागुंनाबाई शिवराम शेगर (40), तुकाराम शेगर (60), आशाबाई सिताराम शेगर (30), रंजनाबाई बापुनाथ शिंदे (30), सीताराम तुकाराम शेगर (35), साईनाथ बापुनाथ शिंदे (04), राजेश सिताराम शेगर (8), करण तुकाराम शेगर (14), पूजा सीताराम शेगर (वय 12, सर्व रा. हदगाव ता. मुधोळ जि. निर्मल, तेलंगणा) अशी जखमींची नावे आहेत. त्यांचा प्राथमिक उपचार शासकीय रुग्णालयात करून पुढील उपचारासाठी शहरातील साई रुग्णालय येथे ऍडमिट करण्यात आले आहे.
काशिनाथ शेगर यांच्या फिर्यादीनुसार, पोहरादेवी व माहूरचे दर्शन घेऊन परत जात असताना, नागपूर तुळजापूर हायवेवर शहरानजीक ढाणकी रोड बायपास वर नांदेड कडून उमरखेड कडे समोरून येणाऱ्या भरधाव महिंद्रा कारच्या समोरासमोर धडक दिल्याने नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.
फिर्यादीकडील टाटा एस या गाडीचे एक लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तर महिंद्रा कारमधील कार चालक कृष्णा माधव रुडे (वय 35) व सोबत असलेला विनोद अंबादास चव्हाण (वय 47, रा. रुडेनगर तांडा, उमरखेड) हे दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.