बंगाडीवासींना लाकडी पुलाचाच आधार! प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष; दरवर्षी श्रमदानातून उभारतात पूल
भामरागड जिल्ह्याच्या दक्षिण भागातील शेवटचा टोक असलेल्या भामरागड तालुक्यात आजही मुलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. रस्ते व पुलांची बांधकामे होत असली, तरी त्यांची गती संथ आहे. त्यामुळे येथील नागरिक दरवर्षी पारंपरिक पद्धतीने आपल्या गावाकरिता सोयीसुविधा निर्माण करीत असतात. नक्षलग्रस्त लाहेरीजवळील चंगाडी गावातील नागरिकांनी एकत्र येऊन श्रमदान करीत गावाजवळून वाहणाऱ्या नदीवर ‘लाकडी पूल’ उभारला. शासन, प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे दरवर्षी ग्रामवासी श्रमदानातून आवश्यक गरज लक्षात घेत लाकडी पूल उभारत आले आहेत.
भामरागड तालुक्यातील लाहेरी अंतर्गत येणाऱ्या बंगाडी या गावात ४० घरांची वस्ती आहे. गंडेनूर ते बंगाडीदरम्यान वाहणाऱ्या नदीवर बेलीब्रीजचे काम सुरू आहे. सद्यःस्थितीत दोन्ही बाजूच्या पिल्लरचे बांधकाम झाले आहे. मात्र, मध्यभागातील काम झालेले नसल्याने नागरिकांना आवागमनासाठी नदीपात्रातून प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात बंगाडी येथील नागरिकांना नदीतून जीव धोक्यात घालून नावेने प्रवास केल्याशिवाय पर्याय नसतो. परंतु, पावसाळा ओसरल्यानंतर नदीचा प्रवाह कमी होत असला, तरीसुद्धा नागरिकांना तालुका मुख्यालयासोबत लाखोरीला येण्यासाठी नावेचाच आधार घ्यावा लागतो. या समस्येवर स्थानिक नागरिकांनी आपल्या कल्पकतेच्या बळावर उपाय शोधला आहे. पावसाळा ओसरल्यानंतर येथील नागरिक एकत्र येत ‘लाकडी पूल’ बनविण्यासाठी श्रमदान करतात. परिसरातील जंगलात मिळणारे मजबूत वेल, बांबू, लाकडी फाटे यापासून पुलाची निर्मिती केली जाते. आता याच पुलावरून परिसरातील नागरिकांचे आवागमन होत आले आहे.
यावर्षी परिसरात चांगला पाऊस बरसल्यामुळे अजूनही नदीचा प्रवाह वेगवान आहे. त्यामुळे लाकडी पुलासाठी पिल्लर बनविणे अत्यंत कठीण होते. मात्र, नागरिकांनी आपल्या अनुभवाचा वापर करीत बांबूपासून गोलाकार पिल्लर बनवून त्यात मोठ्या प्रमाणात दगडे भरली. त्यामुळे पिल्लर उभे राहिले व पाच पिल्लरचा आधार घेत नागरिकांनी त्यावर मजबूत लाकडी फाटे वापरून ‘लाकडी पूल’ साकारला,
या लाकडी पुलावरून ग्रामवासींचे शहर तसेच तालुका मुख्यालयात ये-जा सुरू आहे. शासन, प्रशासन विकासाच्या बाता मारत असले, तरी जमिनीवरील वास्तव स्थिती अधिक भयावह असल्याचे हे वास्तव उदाहरण आहे. त्यामुळे बंगहठीचासींचा हा संघर्ष केव्हा संपणार? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे.






