पुणे: पुण्यातली एक धक्कादायक बातमी समोर येत(Pune News) आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या(Wishrambag Police Station) अंतर्गत असलेल्या पोलीस कोठडीत चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या (Pune Jail Suicide) केल्याची माहिती मिळाली आहे. शिवाजी गरड असं आत्महत्या केलेल्या आरोपीचं नाव आहे. ही घटना आज (17 मे) सकाळी 6 वाजता उघडकीस आली. (Pune Suicide News)
गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने शिवाजी गरड याला हडपसर परिसरातील एका चोरीच्या गुन्ह्याखाली अटक केली होती. त्याला विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं. आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्याने लॉकअपमध्ये पाहिलं आणि त्याला धक्काच बसला . कारण त्यांना शिवाजी गरड हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
पांघरुणासाठी दिलेल्या चादरीचा काठ कापून त्याच्या मदतीने त्याने गळफास घेतला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
चोरीच्या गुन्ह्यामुळे शिवाजी गरड याला रात्री लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र रात्रीच त्याने पांघरुणासाठी दिलेल्या चादरीचा काठ कापला आणि बाथरुममध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केली. सकाळी हा सगळा प्रकार कर्मचाऱ्याने पाहिला आणि खळबळ उडाली. पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू झाला असल्यास त्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) जातो. त्यामुळे सीआयडी या प्रकरणाचा तपास करत आहे. तसेच अशा घटनेतील आरोपीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन तहसीलदारांच्या उपस्थितीत व्हिडीओ शूटिंग करुन केले जाते. त्यानुसार शवविच्छेदन करण्यात येईल.
सध्या पुणे शहरात आत्महत्येच्या घटना वारंवार घडताना दिसत आहे. त्यात तरुणांच्या आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे. क्षुल्लक कारणावरुन अनेक तरुण आत्महत्येचं पाऊल उचलत आहेत. कोरोनानंतर काही विद्यार्थी नैराश्यात आहेत. सोशल मीडियामुळे नैराश्य वाढत असल्याचं तज्ञांचं मत आहे. त्यामुळे अनेकांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्य जास्त प्रमाणात जपावं, असं आवाहन तज्ञांनी केलं आहे. पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला हवं.