पुणे : थर्टीफर्स्टच्या रात्री वाहतूक पोलिसांनी केलेल्या विशेष कारवाईत मद्य प्राशन करुन वाहने चालविणाऱ्या १२१ वाहन चालकांवर कारवाई केली. वाहतूक पोलिसांनी नववर्षाच्या मध्यरात्री शहरातील विविध भागात ही कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी थर्टीफर्स्टच्या निमित्त शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
वाहतूक विभाग, स्थानिक पोलीस व गुन्हे शाखा यांचा विविध भागात बंदोबस्त होता. नाकाबंदी देखील करण्यात आली होती. वाहतूक पोलिसांनी मद्य प्राशन करुन वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली होती. तत्पुर्वी मद्याच्या नशेत वाहने चालविण्याने गंभीर स्वरुपाचे अपघात घडत असल्याने पोलिसांनी मद्य पिऊन वाहने चालवू नये असे आवाहन केले होते. तरीही शहरात थर्टीफस्ट साजरा करण्यासाठी बाहेर पडलेल्या अनेकांनी मद्याच्या नशेतच वाहने चालविली आहेत.
वाहतूक पोलिसांनी शनिवारी (३१ डिसेंबर) रात्री विशेष मोहीम (ड्रंक अँड ड्राइव्ह) राबविली. शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकात ही मोहिम राबवली गेली. त्यात १२१ वाहन चालकांविरोधात कारवाई करण्यात आली, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. वाहतूक पोलिसांनी शहरातील २७ ठिकाणी नाकाबंदी करुन वाहन चालकांची तपासणी केली.