फोटो सौजन्य - सोशल मिडीया
यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सोमवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. ३ दिवसांच्या विश्रांतीनंतर काल मध्यरात्री आणि आज सकाळी यवतमाळमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस बरसला आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडले होते. मात्र आता पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. मुसळधार पाऊस बरसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये काल मध्यरात्री आणि आज सकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळे वाहन चालकांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला.
उत्तर कोकणात गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी काल हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसला. पालघर आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला. पालघर जिल्ह्यात काल १३० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर रायगडमधील कर्जत येथे ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज ठाणे, मुंबई, कोकण आणि कोल्हापुरच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली.
गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने आज अमरावती, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यांत हवामान विभागाने आज यलो अलर्ट दिला आहे. नांदेड, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील काही भागांना हवामान विभागातर्फे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही भागात पावसाचा यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. पुण्यात आज ३५ अंश सेल्सिअस कमाल तर २७ अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल, असे अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.