फोटो सौजन्य: iStock
अहिल्यानगरसह अकोले, पाथर्डी, राहुरी, पारनेर, शेवगाव तालुक्यांत बुधवारी (ता. १८) व गुरुवारी (ता. १९) रात्री अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. काही ठिकाणी गारपीट झाली. पावसामुळे काढणीला आलेल्या गव्हासह हरभरा, मका, कलिंगड, खरबूज, आंबा, कांद्याला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील नेवासे, राहुरी, पारनेर, कर्जत, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, अहिल्यानगर, पाथर्डी, अकोले तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये गहू, हरभऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय कांदा, मका, कलिंगड, खरबुज, हरभरा, वेगवेगळी फुले, फळपीके, आंबा, भाजीपाला, द्राक्ष यांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. फळबागांसह पिकांचे नुकसान झाल्याने अनेकांच्या डोळ्यातील अश्रू थांबलेले नाहीत.
अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्याने शेत पिकाचे मोठ्खा प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनानेच दिलेल्या आकडेवारीनुसार सुमारे तीन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर ३३% पेक्षा कमी नुकसान झाले आहे.
पुण्यात काय बी घडू शकतंय! ना पूर, ना पाऊस तरीही शहरात पाणीच पाणी; नेमका विषय तरी काय?
शासनाच्या निकषानुसार ३३% पेक्षा जास्त नुकसान झाले तरच मदत मिळते. नुकसान हे नुकसानच असते. कुठल्या निकषावरून ही टक्केवारी ठरवतात? त्यासाठी कसे मोजमाप केले जाते? यासंदर्भात मात्र कुठलीही माहिती शेतकऱ्यांना नाही.
शिवाय नुकसान होऊनही अनेक शेतकऱ्यांना या निकषामुळे मदत मिळत नाही. आधीच नैसर्गिक संकटांनी शेतकरी त्रस्त आहे. त्यात शासनाच्या निकषामुळे अनेक शेतकऱ्याना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. झालेले नुकसान पाहून मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.
जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार १४३ गावांतील २० हजार ५३१ शेतकऱ्याचे ११ हजार ५५९ हेक्टरवर नुकसान झाले आहे. त्यात १५ हजार ७२९ शेतकऱ्यांचे ८१७१ हेक्टर क्षेत्रावर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त तर ४ हजार ६३२ शेतकऱ्यांचे ३०२६ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान असल्याची प्राथमिक नोंद आहे.
बुधवार-गुरुवार झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानी बाबत मी प्रशासनास तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी प्रयत्नशील असून पाठपुरावा करणार आहे. असे वक्तव्य नेवासेचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केले आहे.






