फोटो सौजन्य - Social Media
अकोला महापालिकेच्या कचरा संकलन आणि विल्हेवाट प्रकल्पासाठी काढण्यात आलेल्या नव्या निविदेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाला पुन्हा निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात केवळ दोनच निविदा प्राप्त झाल्याने नियमानुसार प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे आता दुसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्याकडे महापालिका प्रशासनासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
यापूर्वी घरोघरी कचरा संकलनाचे काम खासगी कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले होते. मात्र, करारातील अटी-शर्तींचे पालन न झाल्याचा आरोप होत होता. अनेक भागांत घंटागाड्या नियमित फिरत नसल्याने आणि कचरा संकलनात अनियमितता असल्याने नागरिक व लोकप्रतिनिधींनी सातत्याने तक्रारी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीने नव्याने निविदा काढण्यास मंजुरी दिली.
नवीन कंत्राटदाराची नियुक्ती होईपर्यंत विद्यमान कंत्राटदारालाच सेवा सुरू ठेवण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत. यावेळी निविदेच्या अटींमध्ये बदल करण्यात आला असून, घरोघरी कचरा संकलनासोबतच शहरातील विविध भागांतील कचरा गोळा करून तो भोड येथील प्रक्रिया केंद्रापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीही कंत्राटदारावर सोपविण्यात येणार आहे.
मात्र, निविदेतील काही अटी व शर्ती जाचक असल्याने कंत्राटदारांनी कमी प्रतिसाद दिल्याची चर्चा आहे. तसेच या निविदेबाबत शासनाकडे काही तक्रारी दाखल झाल्यानेही इच्छुक कंत्राटदारांनी सावध भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.
नियमानुसार दुसऱ्या टप्प्यातही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध करावी लागेल. तिसऱ्या टप्प्यात दोन वैध निविदा प्राप्त झाल्यास त्या उघडण्याची तरतूद आहे. त्यामुळे आता दुसऱ्या निविदा प्रक्रियेला किती प्रतिसाद मिळतो आणि कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कधी मार्गी लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






