कांद्याचे विक्रीचे दर कोसळल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) हवालदिल झाले आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कांद्याला 2200 ते 2600 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. यावर्षी मात्र हे दर 500 ते 600 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर तातडीने हस्तक्षेप करून कांदा उत्पादकांना सहाय्य करावं, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने (All India Kisan Sabha) खुले पत्र लिहून केली आहे.
[read_also content=”उमेश पाल हत्येप्रकरणी UP पोलिसांची कारवाई, आतिकचा जवळचा मित्र चकमकीत ठार; वाचा पोलिसांनी कसा रचला होता चक्रव्यूह https://www.navarashtra.com/crime/update-up-police-action-in-umesh-pal-murder-case-crook-arbaaz-killed-in-encounter-read-details-here-nrvb-372732.html”]
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात शेतकऱ्यांना प्रति क्विंटल किमान 600 रुपये अनुदान द्यावं, तसेच परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी अपेक्षित इतर उपाययोजना तातडीने आखण्याची आग्रही मागणी किसान सभेच्यावतीने करण्यात आली आहे.
बांगलादेशाने कांदा आयातीवर मोठ्या प्रमाणात कर लादल्याने या देशात होणारी मोठी कांदा निर्यात अशक्य झाली असल्याचं अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी म्हटलं. केंद्र सरकारच्या स्तरावर याबाबत काही पावले उचलली गेल्यास बांगलादेशामध्ये होणारी कांदा निर्यात पुन्हा एकदा व्यवहार्य बनविता येईल. केंद्र सरकारने याबाबत पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असंही नवले यांनी म्हटलं आहे.
फिलीपाईन्स, थायलंडसारख्या देशांमध्ये कांद्याचे भाव खूप उच्चांकी पातळीवर पोहचले आहेत. या देशांबरोबर संवाद साधून देशातील कांदा रास्त दरामध्ये या देशांना पाठविता येईल यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. देशभरातील इतर राज्यांना संपर्क करून देशांतर्गत बिगर कांदा उत्पादक राज्यांमध्ये कांदा पोहचविण्यासाठी नियोजन करण्याची अवश्यकता असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे.
पाकिस्तानाबरोबर बिघडलेल्या संबंधांमुळे पाकिस्तानात होणारी कांदा निर्यात ठप्प झाली आहे.पाकिस्तानला सध्या दुबईमार्गे कांदा जात आहे. दुबईबरोबर भारताचा व्यापार, काही कारणांमुळे तणावग्रस्त झाला आहे. दुबईला यामुळे होणारी कांदा निर्यात बंद आहे. राज्यकर्त्या पक्षांच्या भूमिकांचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागत असल्याचा आरोप किसान सभेने केला आहे. राजकीय शिष्टाईच्या माध्यमातून दुबईला पुन्हा कांदा निर्यात सुरु झाल्यास कांद्याचे देशांतर्गत दर स्थिर करण्यात मोठी मदत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कांदा निर्यातीबाबतचे सातत्याचे धरसोडीच्या धोरणामुळे आपले जागतिक कांदा ग्राहक दुखावले गेले आहे. आगामी काळात याबाबत योग्य सुधारणा करण्याची हामी देऊन या दुरावलेल्या ग्राहकांना पुन्हा एकदा आपलेसे करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने या सर्व उपाय योजनांसाठी रास्त भूमिका बजावण्याची आवश्यकता आहे, असे किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख यांनी म्हटले.
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 600 रुपये सहाय्य देण्याची घोषणा करावी. शिवाय केंद्र सरकारच्या मदतीने वरील प्रमाणे शक्य त्या सर्व उपाययोजना करून कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा अशी मागणी किसान सभेने तातडीने केली आहे.