
कंत्राटदारामुळे स्वच्छता व्यवस्था कोलमडली! कचरा संकलन ठप्प; नागरिकांच्या घरांपुढे कचऱ्याचे ढीग
Amravati News: शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या कोणार्क कंपनीच्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. अनेक भागात घरोघरी कचरा संकलन करणाऱ्या गाड्य महिनाभर फिरकल्या नसल्याच्या तक्रारी आहेत. गणेशोत्सवापासून वाढलेल्या कचऱ्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून कोट्यवधी रुपये खर्च करूनही स्वच्छता व्यवस्था सुरळीत का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.(फोटो सौजन्य – AI)
शहरातील नव्याने विकसित झालेल्या वस्त्यांमध्येही कचरा संकलन विस्कळीत झाले आहे. पूर्वी दर दोन दिवसांनी येणाऱ्या गाड्या आता १५ ते २० दिवसांनी येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सारंग बोलके यांनी स्वच्छता शुल्क आकारणाऱ्या महापालिकेने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली. गृहिणी रोना घाडगे यांनी घरात कचरा साठवून ठेवायचा किती दिवस, असा सवाल उपस्थित केला. साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्यांचा धोका वाढत आहे.
कोणार्क कंपनीकडून कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळत नसल्याचा आरोप आहे. दोन महिन्यांपर्यंत वेतन प्रलंबित राहणे, किमान वेतनापेक्षा कमी मोबदला, भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) रकमांतील अनियमितता तसेच वेतनपत्रिका न देण्याच्या तक्रारी कर्मचाऱ्याऱ्यांनी केल्या आहेत. यासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि कामगार आयुक्तांकडे निवेदन देण्यात आले आहे. कर्मचाऱ्याऱ्यांनी कंपनीच्या नोंदींची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
महापालिकेने १०० हून अधिक वाहने उपलब्ध करण्याच्या सूचना कंपनीला दिल्या होत्या. मात्र, पूर्वीच्या कंत्राटदारांकडून भाड्याने घेतलेली वाहने न्यायालयीन प्रक्रियेनंतर परत करण्यात आल्याने उपलब्ध वाहनांची संख्या ७० हून अधिकने घटल्याचे सांगण्यात येते. परिणामी, घरोघरी कचरा संकलनावर परिणाम झाला आहे.८८ कोणार्क कंपनीला पूर्ण क्षमतेने स्वच्छतेचे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाहनांच्या कमतरतेमुळे काही भागांत कचरा संकलन विस्कळीत झाले असून, परिस्थिती सुधारत आहे.