अमृता फडणवीस (फोटो- ट्विटर)
यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकार म्हणजेच महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजेनची घोषणा केली आहे. त्यासाठी राज्यातील कोट्यवधी महिलांनी अर्ज भरले आहेत. दरम्यान या योजनेनुसार महिलांच्या खात्यात दर महिन्याला १,५०० रूपये जमा केले जाणार आहेत. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून महिलांच्या खात्यात या योजेनचे पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र विरोधक ही योजना निवडणुकीनंतर बंद होणार असल्याचा आरोप करत आहेत. दरम्यान अमृता फडणवीस यांनी या योजनेवरून विरोधकांना सुनावले आहे.
राज्य सरकारने मध्य प्रदेशच्या धर्तीवर माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र विधानसभा डोळ्यासमोर ठेवून योजना आणल्याचा आरोप विरोधक करत आहेत. या योजेनवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. यावर अमृता फडणवीसांनी विरोधकांना सुनावले आहे. त्या म्हणाल्या, लाडकी बहीण योजना ही बहिणींना रक्षाबंधनाची भेट आहे. महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. यातून महिला त्यांच्या लहान मोठ्या गरजा पूर्ण करू शकतील.
निवडणुकीतनंतर माझी लाडकी बहीण योजना बंद होणार असे अमृता फडणवीस यांना विचारले असता त्या म्हणाल्या, जे स्वतः स्टंटमॅन आहेत त्यांनी सरकारने काय करायला हवे हे सांगू नये. सरकार योग्य काम करत असून स्टंटमॅन लोकांनी काही सांगू नये. लाडकी बहीण योजना आणि कोलकाता येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेबाबत देखील त्यांनी भाष्य केले. रुग्णालयात जाऊन पुरावे नष्ट केले जात आहे यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही असे फडणवीस म्हणाल्या.
दरम्यान, राज्यात महिलांसाठी सुरू केलेली महायुती सरकारची लाडकी बहीण योजनेला कोट्यवधी महिलांनी पसंती दाखवीत अर्ज नोंदणी केली आहे, 14 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये पाठविण्याचे काम सुरू झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 2 लक्ष 81 हजार अर्जाला मंजूरी दिली, अशी माहिती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. आता सदर योजना 31 ऑगस्ट नंतर बंद करण्यात येणार अशी अफवा सुरू आहे, पण ही योजना कधीच बंद होणार नाही. 31 ऑगस्टनंतर सुद्धा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात, अर्ज मंजूर झाल्यावर त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार, अशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.