कवठे येमाई : मागील आठ-दहा दिवसांत शिरूरच्या पश्चिम पट्ट्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु होता. जमिनीत चांगलेच पाणी मुरल्याने साप (Snake Captured) बाहेर पडू लागले. आज सकाळी कवठे येमाई गावठाणात राहणारे ढाके यांच्या घरात मोठा काळसर रंगाचा साप दिसला. त्यांनी तातडीने सर्पमित्र निलेश बोडरे यांना फोन करून पाचारण केले. निलेशने अगदी लीलया या धामण जातीच्या सर्पाला पकडले. हा सर्प मोठा होता. या नर जातीच्या धामण सर्पाला बोडरे यांनी घट्ट पकडून पिशवीत जेरबंद केले.
ऐन सकाळी तेही गावठाणात हा मोठा सर्प चक्क घरात आल्याचे दिसल्याने परिसरातील नागरिक चांगलेच घाबरले. तर निलेश बोडरे यांनी आता पावसाळा चालू झाला असून, अनेक छोटे-मोठे सर्प बाहेर पडतात. नागरिकांनी विशेष करून रात्रीच्या वेळी सापांपासून संरक्षण व्हावे म्हणून दक्षता घ्यावी. सर्वच सर्प विषारी नसतात. साप निघाल्यानंतर त्यांना मारू नका. तातडीने नजीकच्या सर्पमित्रास कळवा.
सर्पमित्र सापांना पकडून दूर जंगलात निसर्गाच्या सानिध्यात सोडण्याचे काम करत असतात. सर्पमित्र निलेश बोडरे यांनी या मोठ्या सापास शिताफीने पकडल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.