हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सध्या भलत्याच कारणांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. या महामार्गावर होणारे अपघात या चर्चेचे कारण आहे. आजही समृद्धी महामार्गावर अपघात घडला असून यात दोघे जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. वाशिम जिल्ह्यातील कारंजा गावाजवळ पहाटे दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान हा अपघात घडला.
अपघाताची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करुन प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हालविण्यात आले. अपघाताची घटना इतकी भीषण होती की, कारमधील मुलगी हवेत ऊडून ती समृद्धी महामार्गाच्या बाजूला सुमारे 200 फूट अंतरावर जाऊन पडली. अपघातातील सर्व जण हे नागपूर येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, अपघात घडला त्या वेळी कारमध्ये एकूण चार जण होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाला. दोघांवर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. समृद्धी महामार्गाचे नुकतेच उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर झालेला हा पहिलाच अपघात असल्याचे सांगितले जात आहे. समृद्धी महामार्ग 10 जिल्हे आणि 26 तालुक्यांतून जातो.