सौजन्य : सोशल मीडिया
नागपूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील सर्वच महिलांसाठी महत्त्वाची योजना ठरत आहे. या योजनेवरून महायुतीत पहिली ठिणगी पडली आहे. तिन्ही पक्ष या योजनेच्या वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार व प्रसार करत असल्याने, मतदारांमध्येही संभ्रम पसरला आहे. शिवाय, या पक्षांमध्ये फोटोयुद्ध सुरू झाले. ही योजना हळूहळू तिन्ही पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठीही डोकेदुखी ठरत असल्याची चर्चा रंगली आहे.
हेदेखील वाचा : भाजपच्याच कार्यकर्त्याने दाखल केली भाजप खासदाराविरोधात पोलिसांत तक्रार; त्याचं कारण…
शिवसेनेचे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, भाजपचे ‘लाडक्या बहिणींचा… देवाभाऊ’ तर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ‘दादांचा वादा’ या तीन वेगवेगळया टॅगलाईनने राज्यात मोठी संभ्रमावस्था पसरविली आहे. शिवाय, तिन्ही पक्षांचे बॅनर्स व पोस्टरवर त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांचे फोटो मोठे दिसत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये यातून वेगवेगळ्या भावना निर्माण झाल्याचे दिसत आहे.
राज्य सरकारची ही योजना असल्याने सत्तेत सहभागी असलेल्या तिन्ही पक्षांची ही योजना आहे. एकाचवेळी कोट्यवधी लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन हप्त्यातील प्रत्येकी दीड हजार असे 3 हजार गेल्याने त्या आनंदी आहेत. परंतु, राज्य सरकारचे सरकारी कार्यक्रम वगळता पक्षांनीही त्यांची वेगवेगळी वाट यासाठी चोखाळली आहे.
योजना ठरणार टर्निंग पॉईंट
निवडणुकीत हीच योजना ‘टर्निंग पॉइंट’ ठरेल, यावर महायुती ठाम आहे. त्यादिशेने तिन्ही पक्षांनी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले आहे. राज्यभर इतर योजना वगळता याच योजनेची जाहिरात फलक, पोस्टर्स, बॅनर्स व कार्यक्रम होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे फोटो झळकत होते.
आमचे फोटो नकोच
अद्यापही या तिन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांतील मनभेद दूर न झाल्याने काही ठिकाणी शिंदे, फडणवीस तर, काही ठिकाणी शिंदे-पवार व काहींनी फडणवीस-पवार असे फोटो लावले. त्यामुळे वादात मिठाचा खडा पडला. त्यानंतर आता आमच्या फोटोच टाकू नका, अशी म्हणण्याची वेळ या तिन्ही नेत्यावर आली आहे.
हेदेखील वाचा : ‘येऊ नको म्हटलं तरी कोणत्या गाडीत बसू अशी अवस्था’; अजित पवारांना पुन्हा डिवचलं