नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई; कोटीचा दंड वसूल (फोटो सौजन्य-X)
अमरावती : शहराच्या हवेत दिवसेंदिवस धुराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. एकीकडे सरकार इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतानाच दुसरीकडे रस्त्यांवर अजूनही प्रदूषण करणारी जुनी वाहने सर्रासपणे धावत आहेत. गतकाळातील मागोवा घेतला असता एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीत प्रदूषण करणाऱ्या 3027 वाहनांना दंड ठोठावण्यात आला आहे. त्यापैकी 856 वाहनचालकांनी 7 लाख 29 हजार रुपयांचे तडजोड शुल्काचा भरणा केला आहे.
याशिवाय, एप्रिल 2025 ते जून 2025 या कालावधीमध्ये 785 दोषी वाहनांवर कारवाई करून 3 लाख 97 हजारांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. प्रादेशिक परिवहन विभागाने धूर सोडणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. प्रादेशिक परिवहन अमरावती कार्यालयाच्या वायुवेग पथकांद्वारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर नियमित कारवाई करण्यात येणार आहे. दुसरीकडे, इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देऊन हवेतील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
हेदेखील वाचा : नवी मुंबईतील सर्व शाळांनी शालेय बस धोरणची अंमलबजावणी करावी, मनसेचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला पत्र
इंधनाच्या अकार्यक्षमतेमुळे आणि जुन्या आणि जीर्ण झालेल्या वाहनांच्या अतिरेकी वापरामुळे शहराची फुफ्फुसे धुराने भरत आहेत आणि संपूर्ण शहर गुदमरत आहे. हे लक्षात घेऊन, प्रादेशिक परिवहन विभागाने अशा वाहनांवर कारवाई करण्यास वेग दिला आहे. हवेतील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी, पेट्रोल आणि इतर फायदेशीर इलेक्ट्रिक वाहनांसह सौरऊर्जेचा वापर करण्याचे अनेक फायदे आहेत. वाहनाला वीज देण्यासाठी सूर्यप्रकाशाचा वापर केल्याने पैसे वाचतात आणि इलेक्ट्रिक ग्रीडला फायदा होतो. त्यामुळे घरासाठी बॅकअप पॉवर मिळण्यासही मदत होते.
डिझेल इंजिनचा धूर धोकादायक
डिझेल इंजिनमधून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड आणि विविध प्रकारचे धोकादायक पदार्थ उत्सर्जित होतात, जे हवेत विरघळतात आणि आरोग्याला धोका निर्माण करतात. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीसारख्या इंधनांवर चालणाऱ्या वाहनांमधून कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साईड आणि कण उत्सर्जित होतात. त्यामुळे हवेची गुणवत्ता प्रभावित होते. सामान्यतः वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणाबद्दल खूप गोंधळ उडतो.
काय आहेत पीयूसीचे नियम?
सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. वाहनांच्या उत्सर्जन पातळी नियंत्रित करण्यासाठी ते प्रमाणपत्र आवश्यक आहे. पीयूसी प्रमाणपत्राविना वाहन चालवणे हे वाहतूक नियमांचे उल्लंघन आहे. म्हणून वेळोवेळी पीयूसी अपडेट करणे खूप महत्त्वाचे आहे. मोटर वाहन कायदा 1988 नुसार भारत सरकारने सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्र घेणे अनिवार्य केले आहे.