मुंबई : तुमचंही नाव रेशन कार्डावरुन गायब झालेलं नाहीये ना. राज्यात सध्या एक देश एक रेशन कार्ड या योजनेंतर्गत पडताळणी प्रक्रिया सुरु आहे. आत्तापर्यंत रेसनिंग कार्यालयानं १० लाख रेशन कार्ड रद्द केलेली आहेत. त्यामुळं ४३ लाख नागरिकांची नावं रेशन कार्डावरुन कापण्यात आलेलेी आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलंय की, ही पडताळणीची प्रक्रिया कार्डधारकांचीही जबाबदारी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना या प्रक्रियेत नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज व्यक्त करण्यात येतेय. सरकारीा रेशन दुकानदार आता रेशन कार्डातील प्रत्येक व्यक्तीचं आधार कार्ड मागतायेत. या आधारानं ही पडताळणी पूर्ण करण्यात येतेय. आधार कार्डाची प्रत जर दिली नाही तर सरकारी रेशन मिळणार नाही, असा निर्णय घेण्यात आलेला आहे. जे रेशन कार्ड धारक आधारकार्ड देण्यात टाळाटाळ करतायेत त्यांना संशयास्पद या श्रेणीत टाकण्यात येते आहे. तूर्तास त्यांची नावं रद्द करण्यात आलेली नाहीत.
रेशनकार्डात आपले नाव आहे का, तपासा
सगळश्या रेशनकार्ड धारकांनी वेळोवेळी रेशन कार्डावर आपलं नाव आहे की नाही, याची तापसणी करुन घ्यावी, असं आवाहन अधिकाऱ्यांच्याकडून करण्यात येतंय. राज्यात सध्या २ कोटी ५७ लाख ७४ हजार १३४ रेशन कार्ड आहेत. तर राज्यात ५३,०२८ सरकारी रेशन दुकानं आहेत.
ड्युप्लिकेट रेशन कार्डना बसणार चाप
स्वस्त धान्य मिळवण्यासाठी एकेका घरात ४-४ रेशनकार्ड असल्याचं केंद्र सरकारच्या पाहणीत समोर आलंय. त्यामुळेच आता डुप्लिकेट रेशन कार्डांची तपासणी करण्यात येतेय. राज्यात आत्तापर्यंत १० लाख अशी कार्ड रद्द करण्यात आलीत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत अशा ७० लाख कार्ड धारकांना सध्या संशयास्पद श्रेणीत ठेवण्यात आलेलं आहे. या यादीत असणाऱ्यांना स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यांनी सत्य पुरावे देण्याची गरज आहे.
एकाच जागी असेल रेशन कार्डावर नाव
बऱ्याच जणांकडे गावात आणि शहरात अशी दोन कार्ड आहेत. अशांची छाटणी करण्यासाठी सरकार रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करतेय. राज्यातील ९८ टक्के रेशन कार्डही आधारशी लिंक करण्यात आलीयेत. ज्यांची नावं दोन तीन कार्डांवर आहेत, त्यांनी एकाच ठिकाणी त्यांचं नाव ठेवावं, असं सांगण्यात आलंय. याचा निर्णय केला नाही तर अधिकारी त्यांच्या पातळीवर हे करणार आहेत.