मावळ भागासाठी निगडी ते लोणावळा नवीन मेट्रो प्रकल्पास मंजुरी द्यावी, अशी मागणी बाळा भेगडे यांनी केली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Pune Metro News : वडगाव मावळ : सतीश गाडे : पुणे शहरामध्ये मेट्रोचे (Pune Metro) जाळे विस्तारत आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास सुखरक झाला असून यामुळे नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळत आहे. दरम्यान, हिंजवडी शहरातून मावळ तालुक्यातील तळेगाव–नवलाख उंब्रे एमआयडीसीपर्यंत तसेच निगडी ते लोणावळा नवीन मेट्रो प्रकल्पास मंजुरी द्यावी, अशी आग्रही मागणी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन त्यांनी ही मागणी मांडली. (Maval News)
मावळ तालुक्यातील तळेगाव–नवलाख उंब्रे एमआयडीसी हे आशियातील सर्वात मोठ्या औद्योगिक हबपैकी एक बनले असून, या परिसरात रोजगारासाठी हिंजवडी, पिंपरी-चिंचवड भागातून मोठ्या प्रमाणावर अधिकारी व कामगारांची ये-जा सुरू असते. मात्र, वाढत्या वाहतूक कोंडीमुळे कंपन्या तसेच ट्रान्सपोर्ट सेवा पुरवठादारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
तसेच पुणे–निगडी मेट्रो प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, निगडी ते लोणावळा मेट्रो मार्ग मंजूर झाल्यास मावळ तालुक्यातील पर्यटन विकासाला मोठी चालना मिळेल, असे मत व्यक्त करत या प्रस्तावाबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंतीही करण्यात आली.
हे देखील वाचा : अमली पदार्थ विक्रेत्यांवर मकोका लावणार; पुणे पोलिस आयुक्तांचा इशारा
दरम्यान, मावळ तालुक्यातील तळेगाव, नवलाख उंब्रे, सोमाटणे, वडगाव, कान्हे आदी परिसरात गेल्या काही वर्षांत औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने विस्तार झाला आहे. विविध नामांकित कंपन्या, उत्पादन उद्योग आणि लॉजिस्टिक पार्क उभारल्यामुळे या भागात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्या आहेत. परिणामी पुणे, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी तसेच आसपासच्या ग्रामीण भागातून हजारो अधिकारी, अभियंते, कामगार व कर्मचारी दररोज या औद्योगिक क्षेत्रात ये-जा करत आहेत.
यासोबतच परिसरातील वाढती लोकसंख्या, नव्याने उभारल्या जाणाऱ्या निवासी टाउनशिप, गृहनिर्माण प्रकल्प आणि व्यावसायिक संकुलांमुळे रस्ते व वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत मुख्य रस्ते, चौक आणि औद्योगिक भागाकडे जाणारे मार्ग वाहतूक कोंडीने अक्षरशः ठप्प होत असून वाहनचालकांना तासन्तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावे लागत आहे.
हे देखील वाचा : Baramati by-electionची रणधुमाळी सुरु असताना सुनेत्रा पवार वर्षा बंगल्यावर; फडणवीसांनी दिला शब्द
या वाहतूक कोंडीमुळे केवळ नागरिकांचाच वेळ व इंधन वाया जात नाही, तर उद्योग क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. कर्मचाऱ्यांना वेळेत पोहोचण्यात अडचणी निर्माण होत असून मालवाहतूक आणि ट्रान्सपोर्ट सेवांमध्ये विलंब होत आहे. त्यामुळे भविष्यातील वाढती गरज लक्षात घेता या भागासाठी आधुनिक, जलद आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणे अत्यावश्यक बनले आहे.
याच पार्श्वभूमीवर हिंजवडी–तळेगाव–नवलाख उंब्रे एमआयडीसी तसेच निगडी–लोणावळा मेट्रोसारखे महत्त्वाचे प्रकल्प लवकरात लवकर मंजूर करून राबविण्याची मागणी जोर धरत आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यास वाहतूक कोंडी कमी होऊन उद्योग, रोजगार, पर्यटन आणि स्थानिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे मत नागरिक व उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे.






