मावळमध्ये बॉस्केटबॉल कोर्टमधील खांब पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला (फोटो - सोशल मीडिया)
Maval News : वडगाव मावळ : सतिश गाडे : मावळ तालुक्यातील इंदोरी येथे रविवारी (दि. ५) सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. तोलानी मेरीटाईम इंडस्ट्रीच्या मैदानावर बास्केटबॉल खेळताना पोस्ट कोसळून २० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मृत विद्यार्थ्याचे नाव विशाल वर्मा (वय वर्षे २०) असे असून तो इंदोरी येथील विद्यार्थी वसतिगृहात राहत होता. त्याचे मूळ गाव अयोध्या, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथे आहे.
रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास तोलानी एचडी आवारातील बास्केटबॉल ग्राऊंडवर विद्यार्थी खेळत असताना ही घटना घडली. खेळादरम्यान विशाल वर्मा हा बास्केटबॉल रिंगला लटकला असता, रिंग तुटली आणि त्यासोबत संपूर्ण लोखंडी पोल खाली कोसळला. हा पोल थेट त्याच्या अंगावर पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली.
हे देखील वाचा : पिंपरी-चिंचवडकरांनो पाणी जपून वापरा! पवना धरणात जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा
त्याला तातडीने तळेगाव दाभाडे येथील भाऊसाहेब सरदेसाई जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती हॉस्पिटलच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचिता काळे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांना दिली. याबाबतची माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर यांनी दिली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, कॉलेज प्रशासनाने पोलिसांना माहिती देण्यास उशीर केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी सुमारे तीन तासांचा विलंब झाल्याचेही समोर आले आहे.
हे देखील वाचा : साखर उत्पादनात महाराष्ट्राची उत्तुंग झेप; राज्यातून तब्बल 98.95 लाख टन साखरेची विक्रमी निर्मिती
तळेगाव दाभाडे पोलिसांच्या तपासात हलगर्जीपणा; जवानाचा मृत्यू
तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफमध्ये कार्यरत असलेले जवान प्रशांत कदम यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या तपासातील गंभीर हलगर्जीपणा समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशांत कदम हे २५ मार्च रोजी घरातून ड्युटीवर जात असल्याचे सांगून बाहेर पडले होते. ते गांधीनगर (गुजरात) येथे सीआरपीएफमध्ये कार्यरत होते. मात्र, लोणावळा येथून ते कोणालाही न सांगता पुन्हा तळेगावच्या दिशेने परतले. त्यानंतर त्यांचा मोबाईलही बंद होता. त्याच रात्री सोमाटणे फाटा परिसरातील ‘हॉटेल अंगण’ समोर रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात येत होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात “अनोळखी मृतदेह” अशी नोंद करण्यात आली. दरम्यान, कदम यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा बेपत्ता झाल्याची तक्रारही त्याच पोलीस ठाण्यात दिली होती. दोन ते तीन दिवस कुटुंबीय आणि पोलीस दोघेही त्यांचा शोध घेत होते. परंतु, एकाच ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची तक्रार आणि अनोळखी मृतदेहाची नोंद असूनही पोलिसांनी त्यांची सांगड घालून तात्काळ तपास केला नाही, हे धक्कादायक आहे. शेवटी, पोलिसांऐवजी मित्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कुटुंबीयांना वायसीएम रुग्णालयात मृतदेह असल्याचे समजले.






