दादा नसताना अशी सभा घ्यावी लागेल, असे कधीच वाटले नव्हते; जय पवार भावूक
ते म्हणाले, “दादांच्या निधनानंतर वहिनींवर मोठे दुःख कोसळले. मात्र स्वतःचे दुःख बाजूला ठेवून त्यांनी दादांची जबाबदारी स्वीकारली. दादांनंतर कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आता आपला आधार कोण, असा प्रश्न विचारला असताना वहिनी स्वतः पुढे आल्या आणि सर्वांच्या आधार बनल्या. त्यामुळे दादांच्या जुन्या सहकाऱ्यांकडून वेगळा निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा आम्हाला नव्हती.”
जय पवार पुढे म्हणाले, “आम्ही कधीही कोणाच्या विरोधात वैयक्तिक टीका करत नाही. कारण स्व. अजितदादांनी आम्हाला स्वच्छ राजकारण करण्याची शिकवण दिली आहे. व्यक्तीवर टीका करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण करायचे, शेतकरी आणि सभासदांच्या हिताला प्राधान्य द्यायचे, हीच दादांची भूमिका होती.”
“आजही आम्ही त्याच विचाराने पुढे जात आहोत. सोमेश्वर कारखाना हा कोणत्याही एका व्यक्तीची मालमत्ता नसून हजारो सभासद आणि शेतकऱ्यांच्या कष्टातून उभा राहिलेला सहकाराचा वारसा आहे. हा वारसा अधिक सक्षमपणे पुढे नेण्यासाठी सभासदांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा आमचा निर्धार आहे,” असेही जय पवार यांनी स्पष्ट केले.यावेळी नाझरे सुपे परिसरातील कारखाना सभासद, शेतकरी, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






