
Beed drought crop damage
Beed Farmers : पावसाळा सुरू होऊन तीन ते साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटला, तरी बीड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाने पाठ फिरवल्याचं चित्र आहे. पावसाअभावी शेतातील उभी पिकं वाळत असल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर मोठं संकट उभं राहिलं आहे. हातातोंडाशी आलेली पिकं डोळ्यादेखत करपताना पाहून शेतकऱ्यांचा संयम आता सुटू लागला आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना बीडमधील शेतकऱ्यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार नाराजी व्यक्त केली आहे. ‘शेतकरी मेला काय आणि जगला काय, सरकारला काहीच देणं-घेणं नाही,’ अशा शब्दांत शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीची तातडीने दखल घेऊन कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी सरकारच्या प्राधान्यक्रमावरच सवाल उपस्थित केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे जाण्यासाठी सरकारकडे वेळ आहे, मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी वेळ नाही, अशी टीका त्यांनी केली. ‘जरांगेंना आमचा विरोध नाही, पण शेतकरीही जगला पाहिजे,’ असं म्हणत सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावं, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
Manoj Jarange Patil : ‘जरांगे भंपक माणूस, ऑस्करसाठी नामांकन पाठवा’; अजय बारसकरांची घणाघाती टीका
नुकसानीची पाहणी करण्यासाठी अद्याप मंत्री, आमदार, खासदार किंवा शासनाचा प्रतिनिधी शेतावर आला नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. ‘शेतात गांजाचं एक झाड सापडलं असतं तर सगळं प्रशासन धावत आलं असतं,’ असा टोला लगावत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. पावसाअभावी गुरांसाठी चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून हाताला कामही नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
गेल्या दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने सहा एकरमधील सोयाबीनचं पीक पूर्णपणे वाळून गेलं. मजूर लावण्याचा खर्च परवडत नसल्याने बाप-लेकाने स्वतःच्या हाताने पीक उपटून टाकल्याची हतबल करणारी परिस्थिती समोर आली आहे. या पिकासाठी दोन ते अडीच लाख रुपये व्याजाने काढून खर्च केल्याचं संबंधित शेतकऱ्याने सांगितलं.
दरम्यान, सरकार आणि विरोधकांवरही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता सरकार या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन मदतीची घोषणा कधी करणार आणि कोरडा दुष्काळ जाहीर करणार का, याकडे बीडमधील शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.