संतोष देशमुख हत्या प्रकरण (फोटो- सोशल मिडिया / टीम नवराष्ट्र)
बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची एसआयटी चौकशी आणि न्यायालयील चौकशी केली जाईल. सध्या या प्रकऱणातील पोलीस एसपींची तत्काळ बदली करण्यात आली आहे, एवढ्यावरच न थांबता या प्रकरणातील पाळंमुळं खोदली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची ठेत उचलबांगडी केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता नवनीत कॅावत यांची बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवनीत कॅावत यांनी पदभार स्वीकारताच काही महत्वाचे आदेश दिले आहेत.
बीडमध्ये झालेल्या प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बीडच्या मस्साजोगमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्याचे दिसत आहे. ते लवकरात लवकर बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे प्रकरण इथपर्यंत प्रकरण मर्यादीत नाही. या प्रकरणाची पाळंमुळं खोदावी लागतील.” फडणवीस म्हणाले, “ आवाडा एनर्जी कंपनीने पवनचक्कीमध्ये गुंतवणूक केली. यातून काहींना रोजगार मिळतो, पण आम्ही सांगतो तोच दर द्या अन्यथा खंडणी द्या, असाही प्रकार उघडकीस आला आहे. 6 डिसेंबरला दुपारी साडेबाराच्या दरम्यान अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतिक घुले यांनी आवाड ग्रीन एनर्जीच्या कार्यालयावर हल्ला केला. सर्वात आधी त्यांनी वॉचमॅम अमरदिप सोनावणेला मारहाण केलीय त्यानंतर मॅनेजर शिवाजीराव थोपटेलाही शिवीगाळ करत मारहाण केली. ”
बीडमधील दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई- मुख्यमंत्री फडणवीस
बीड, परभणी मधील घटना दुर्दैवी आहेत. या दोन्ही घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली असून बीड जिल्ह्यातील हत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन आणि एसआयटी अशी दुहेरी चौकशी केली जाईल. या प्रकरणातील दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल. तर परभणी मधील संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
बीड, परभणी घटनांमधील दोन्ही मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्यानुसार बीडमध्ये हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख आणि परभणी मधील घटनाक्रमात मृत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना ही दहा लाखांची मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बीड येथील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोहीम हाती घेणार असून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
बीडचे नवीन पोलीस अधीक्षक काय म्हणाले?
आयपीएस अधिकारी नवनीत कॅावत हे छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. मात्र आता त्यांची नियुक्ती बीडच्या पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. नियुक्ती होताच नवनीत कॅावत म्हणाले, सरपंच संतोष देशमुख प्रकरणात मी जातीने लक्ष घालणार आहे. जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. एक दोन दिवसांत मी पीडित कुटुंबाला भेट देणार आहे. लवकरच मी अधिकाऱ्यांची भेट घेऊन महत्वाचे निर्देश देणार आहे. बीड जिल्ह्यातील दहशत खपवून घेणार नाही. बीडमधील परिस्थिती नियंत्रणात आणणे हे माझे पहिले कर्तव्य आहे. नागरिकांनी भीतीच्या वातावरणात राहू नये. येत्या काही दिवसांत बीड जिल्हा गुन्हेगारी मुक्त करणार आहे. कोणत्याही आरोपीची गय केली जाणार नाही.