किरण ठाकरे यांच्याकडून 250 कोटींची विकास कामे, माणगावतर्फे वारेडीच्या विकासाचा दावा (फोटो सौजन्य-Gemini)
कर्जत : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान 7 फेब्रुवारीला होणार आहे तर 9 फेब्रुवारीला मतमोजणी असणार आहे. याचदरम्यान आता कर्जतमधून भाजप उमेदवार राधिका ठाकरे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे. चिंचवली येथील कॉर्नर सभेत भाजप नेत्यांनी विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळाल्यास करोडोंची विकास कामे करण्याचा निर्धार भाजप कडून मतदारांना आश्वासन देताना व्यक्त होत आहे.
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीचे प्रचार अंतिम टप्प्यात आहे. कर्जत तालुक्यातील माणगांव तर्फे वरेडी या गटात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार राधिका ठाकरे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून, ठिकठिकाणी पदयात्रा आणि भेटीगाठींवर भर दिला जात आहे.
चिंचवली येथून सुरू झालेला हा प्रचार दौरा आता आंबिवली आणि परिसरात पोहोचला आहे. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून झालेला विकास तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राधिका ठाकरे यांना ‘कमळ’ या चिन्हावर मतदान करावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.या प्रचार दौऱ्यात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होत असून, राधिका ठाकरे यांचा विजय निश्चित असल्याचा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.भाजप तालुका माजी सरचिटणीस संजय कराळे आणि संदीप म्हसकर यांच्याकडून मतदारांना कॉर्नर सभेत मार्गदर्शन करण्यात आले.
प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना असे दिसून आले की, रेल्वे पट्ट्यातील भागातील महिलांना पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत नवीन बोअरवेल आणि विहिरी खोदून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे आश्वासन भाजप कार्यकर्त्यांनी मतदारांना दिले आहे. किरण ठाकरे यांनी कर्जत तालुक्यात जवळपास २५० कोटी रुपयांचा विकास निधी आणला असून, त्यापैकी माणगांव तर्फे वरेडी भागात १२ ते १३ कोटी रुपयांची महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत. या विकासकामांच्या जोरावरच आम्ही मतदारांकडे जात आहोत आणि आम्हाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.






