बीड : परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण शक्य नाही. असं स्पष्ट केलं. यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही. तोपर्यंत आता माघार नाही, असं म्हणत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अर्धनग्न आंदोलन करून मागण्यांकडे लक्ष वेधले आहे.
बीड आगारात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला 122 दिवस पूर्ण झाले आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवरून एसटी कर्मचारी गेल्या चार महिन्यांपासून संपावर आहेत. संपावर तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने काही दिवसांपूर्वीच अहवाल न्यायालयास सादर केला. त्यावर मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन हा अहवाल सादर करण्यास न्यायालयाने सरकारला सांगितले होते. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानंतर आता हा अहवाल राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान मंत्री अनिल परब यांनी विधानसभेच्या पटलावर ठेवला आहे.
[read_also content=”रशिया- युक्रेन युद्धाचा परिणाम पेट्रोल-डिझेल किंमतीवर होणार? आगामी काळात पेट्रोल-डिझेल 12 रुपयांनी महागणार, जाणून घ्या आजचे दर https://www.navarashtra.com/india/will-russia-ukraine-war-affect-petrol-diesel-prices-petrol-diesel-prices-will-go-up-by-rs-12-in-the-near-future-find-out-todays-rates-249425.html”]