
गत काही महिन्यांपासून अशा प्रकारांची पुनरावृत्ती होत असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पाहणी करून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले. समाजात भीती व अंधश्रद्धा निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचा शोध घेवून त्यांना जेरबंद करण्याची मागणी समितीने केली आहे.
झाडगावातही घडला होता असाच प्रकार
या घटनेपूर्वी ऑगस्ट महिन्यात नजीकच्या झाडगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोरही अशाच स्वरुपाचा प्रकार घडल्याचे समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. वारंवार अशा खुणा व साहित्य ठेवले जात असल्याने नागरिकांना घाबरविण्याचा किंवा परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा हेतू आहे का, याची चौकशी होण्याची गरज व्यक्त होत आहे.
या प्रकारात कोणतीही जादूटोणा, करणी किंवा भानामती असल्याची भीती बाळगू नये. मैदानावर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांनीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे, प्रा. धवन करेले, प्रज्ञाशील मेश्राम, मनोहर लोथे तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी केले आहे. नागरिकांनी अफवा पसरविण्याऐवजी अशा प्रकारांची माहिती संबंधित प्रशासनाला द्यावी, असेही आवाहन करण्यात आले.