Photo Credit : Social Media
गोंदिया: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकांच्य निकालानंतर राज्यातील अनेक बड्या नेतेमंडळी महायुती आणि भाजपला रामराम करताना दिसत आहे. अशातच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भात भाजपला खिंडार पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील भाजपचे एक बडा नेता भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहे.
गोंदियाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते रमेश कुंथे हे आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. कुंथे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे विदर्भात ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे. पण भाजपला पुन्हा मोठा फटकाही बसणार आहे.
भाजपचे नेते रमेश कुंथे हे आज ठाकरे गटात प्रवेश करत घरवापसी करणार आहेत. आज दुपारी साडेबारा वाजता उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडेल. 2018 साली रमेश कुथे यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण आज रमेश कुंथे यांची घरवापसी होणार आहे.
रमेश कुंथे हे १९९५ आणि १९९९ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते. त्यानंतर ते काही काळ राजकारणापासून दूरही राहिले. त्यानंतर 2018 साली त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीतील अनेक नेत्यांनी पुन्हा ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. यामुळे भाजपच्या अडचणीही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रमेश कुंथे भाजप नेत्यांवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मधल्या काळात त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेटही घेतली होती. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण त्यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला. कुंथे यांच्या या पक्षप्रवेशामुळे भाजपला फटका बसणार असला तरी विदर्भात ठाकरे गटाची ताकद वाढणार असल्याचे दिसत आहे.






