डीसीएम अजित पवार यांच्या निधनावर उद्धव ठाकरेंची सोशल मीडिया पोस्ट करुन शोक व्यक्त केला (फोटो - सोशल मीडिया)
Uddhav Thackeray on Ajit Pawar : मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे बारामतीमध्ये अपघाती निधन झाले आहे. बारामतीमध्ये सभेसाठी आलेल्या अजित पवार यांच्या विमानाचा लँडिंगवेळी अपघात झाला. यामध्ये अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शोक व्यक्त केला जात आहे. अजित पवारांच्या आकस्मिक निधनाने राजकीय विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन शोक व्यक्त केला जात आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उद्धव ठाकरे यांनी लिहिले आहे की,” एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला!मी मुख्यमंत्री असताना अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री होते. अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित पवार हे दिलखुलास होते. मनात येईल ते बोलायचे. ते दीर्घद्वेषी नव्हते. राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला, तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत,” अशा भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या.
हे देखील वाचा : महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान…; राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावूक आठवणी
पुढे त्यांनी लिहिले आहे की, “महाराष्ट्रात ते ‘दादा’ म्हणून लोकप्रिय होते. ते असे अकाली जातील असे वाटले नव्हते. कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वात पोकळी निर्माण झाली. ते सर्वार्थाने ‘दादा’ होते. दादांना माझ्यातर्फे, ‘ठाकरे’ व शिवसेना परिवारातर्फे श्रद्धांजली!” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला! मी मुख्यमंत्री असताना अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री होते. अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित पवार हे… — Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) January 28, 2026
हे देखील वाचा : वेळ थांबली… ओळख मात्र घड्याळाने दिली; हातावरचे घड्याळच ठरले ओळखीचे शेवटचे साक्षीदार
आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करुन अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आदित्य ठाकरेंनी लिहिले आहे की, “अजित दादांची बातमी ही धक्कादायक आहे! शब्दच नाहीत. दादांसोबत गेले ५–६ वर्षं काम करण्याची संधी मिळाली… पहिलं सरकारमध्ये आणि नंतर काही दिवस विरोधी पक्षात. त्यांची विधिमंडळ कारभारावर असलेली रुबाबदार पकड आणि प्रेमळ स्वभाव हा आमच्यासारख्या अनेकांना आवडायचा. मी हे विरोधी पक्षात असताना देखील अनेकदा जाहीरपणे म्हटलं होतं. आजची बातमी खरंच धक्का देणारी आहे. अजित दादांना आणि दुर्घटनेतील त्यांच्या सहकाऱ्यांना विनम्र श्रद्धांजली,” अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी शोक व्यक्त केला आहे.






