फोटो - टीम नवराष्ट्र
मुंबई : राज्यामध्ये सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. तसेच उद्या (दि.12) विधान परिषदेची निवडणूक देखील पार पडणार आहे. त्यापूर्वीच महायुतीमध्ये चढाओढ सुरु झाली आहे. विधान परिषदेच्या सभापती पदासाठी विचार केला जात आहे. सत्ताधारी महायुतीमधील एका आमदाराला सभापतिपदी नियुक्त करण्यात येणार आहे. मात्र त्याच्या उमेदवारीसाठी महायुतीमधील कॉंग्रेस, शिंदे गट व अजित पवार गट यांच्यामध्ये चढाओढ सुरु झाली आहे.
मागील दोन वर्षापासून विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त आहे. विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी ऑगस्ट 2022 मध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांची मुदत संपली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. यापूर्वी नीलम गोऱ्हे या शिवसेना ठाकरे गटामध्ये होत्या. मात्र त्यांनी पक्षप्रवेश करत शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या उपसभापतिपदी शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे आहेत. आता त्या सभापती पदासाठी उत्सुक असून शिंदे गटाकडून त्यांचा नावाचा दावा केला जात आहे. तसेच सभापती पदासाठी अजित पवार गट व भाजप आग्रही आहे.
सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्येच विधान परिषदेच्या सभापतीच्या पदाबाबत निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, युतीमध्ये सामील होण्यापूर्वी अजित पवार गटाला विधान परिषदेच्या सभापती पदाबाबत शब्द देण्यात आला होता. सध्या वरच्या सभागृहामध्ये अजित पवार गटाचे अमोल मिटकरी, रामराजे नाईक निंबाळकर, सतीश चव्हाण, विक्रम काळे असे चार सदस्य आहेत. तर भाजपकडून राम शिंदे यांच्या नावाची शिफारस केली जात आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या सभापतिपदाची माळ कोणत्या पक्षाच्या नेत्याच्या गळ्यात पडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच महायुतीमध्ये कोणत्या पक्षाचा दावा मान्य होईल याची देखील चर्चा रंगली आहे.






