
फोटो सौजन्य - Social Media
बुलढाणा : घाटबोरी वनपरिक्षेत्रातील नागेशवाडी येथे सागवान वृक्षांच्या तोडीचे प्रकरण समोर आल्यानंतर वनविभागाने पंचनामा केला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुख्यालयापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात तब्बल ५७ सागवान वृक्ष तोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असताना वनविभागाला याची माहिती का मिळाली नाही, असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नागेशवाडी येथील शेतकरी पांडुरंग सीताराम शेळके यांच्या शेतातील सागवान वृक्षांची मंगळवारी सकाळपासून तोड सुरू करण्यात आली. झाडे तोडण्यासाठी यांत्रिक साधनांचाही वापर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. स्थानिकांनी या प्रकाराची माहिती वनविभागाला दिल्याचा दावा केला जात असला तरी मोठ्या प्रमाणात झाडे तोडल्यानंतरच विभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केल्याची चर्चा आहे.
या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संबंधित शेतकऱ्याने सागवान वृक्ष तोडण्यासाठी वनविभागाकडे पूर्वीच परवानगीसाठी अर्ज केला होता. मात्र, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे हे प्रकरण प्रलंबित असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. घाटबोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले यांनी सांगितले की, वन सर्वेअरकडून जागेची पडताळणी करण्यात आली होती; परंतु आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असल्याने परवानगी मंजूर करण्यात आलेली नव्हती.
दरम्यान, परवानगी न मिळाल्यानंतरही वृक्षतोड कशी झाली, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच शेतकऱ्याने वारंवार अर्ज करूनही त्यावर अंतिम निर्णय का झाला नाही, याबाबतही चर्चा रंगली आहे. काही स्थानिकांनी या प्रकरणात संगनमताची शक्यता व्यक्त करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
विशेष म्हणजे, २०२३ मध्येही घाटबोरी वनपरिक्षेत्रात सागवान तोडीचे एक प्रकरण चर्चेत आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा अशा प्रकारची घटना घडल्याने वनसंवर्धन आणि देखरेख यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी वरिष्ठ वनअधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, तसेच प्रत्यक्ष जंगल परिसराची पाहणी करावी, अशी मागणी केली आहे.
सध्या बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा उपवनसंरक्षक म्हणून कार्यरत असलेले जमीर शेख यांनी अलीकडेच अवैध वृक्षतोड आणि करवत गिरण्यांविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. त्यामुळे नागेशवाडी येथील या प्रकरणातही कठोर चौकशी होऊन दोषींवर योग्य ती कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.