
प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत प्राप्त तक्रारी, शेतकऱ्यांनी सादर केलेले नुकसान कळविण्याचे अर्ज, पंचनाम्यांची सद्यस्थिती तसेच विमा नुकसानभरपाईबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी घेतली. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देऊन त्यांना पीककर्ज उपलब्ध करून द्यावे. पात्र शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहता कामा नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी दिले.ते पुढे म्हणाले की, नुकसानग्रस्त क्षेत्राची वस्तुनिष्ठ नोंद करून पात्र शेतकऱ्यांना मदत मिळेल याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पीकविमा योजनेअंतर्गत आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. महसूल, कृषी विभाग आणि संबंधित विमा कंपनीने समन्वयाने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.
३४ हजार ८५५ लाभार्थ्यांना २९५.४७ कोटींचा निधी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण १ लाख १५ हजार ५१६ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ८५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले. पहिल्या यादीत जाहीर झालेल्या जिल्ह्यातील ३४ हजार ८५५ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २९५.४७कोटी रुपयांचा निधी थेट वितरित करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी दिली.
खरीप हंगाम २०२६-२० साठी सुधारित प्रधानमंत्री पीकविमा योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली असून, यावर्षी बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची अधिकृत विमा कंपनी म्हणून नियुक्ती करण्यात आली. खरीप २०२४-२५ मध्ये ५ लाख ९७हजार शेतकऱ्याना ७१५ कोटी २८ लाख रुपये नुकसानभरपाई वितरित करण्यात आली. खरीप २०२५-२६ मध्ये २० हजार ३३० शेतकऱ्याना ४ कोटी ९० लाख रुपये नुकसानभरपाई मिळाली. खरीप २०२६-२७ साठी आतापर्यंत ३ लाख ३२ हजार ४९६ शेतकऱ्यानी पीकविमा योजनेत सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यानी दिली.
बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख ७७ हजार बाधित शेतकऱ्यांना शेतीपिके व जमीन नुकसानीपोटी ४५५ कोटी ९८ लाख रुपये मदत थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून वितरित करण्यात आली. तसेच जून व जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून, बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत लवकरच दिली जाईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांनी दिली.