संग्रहित फोटो
बुलढाणा : विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतरांचं सत्र सुरूच आहे. आता बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. चिखलीचे माजी आमदार आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांनी स्वतः केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे चिखलीसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
राहुल बोंद्रे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या राजकीय निर्णयाची माहिती दिली. काँग्रेससोबतच्या प्रदीर्घ प्रवासाच्या आठवणींना उजाळा देताना पक्षाने सामाजिक आणि राजकीय वाटचालीत अनेक संधी आणि पदं दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेससोबत काम करताना अनेक जिवाभावाची माणसं जोडली गेल्याचंही त्यांनी नमूद केलं.
आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला मुकुल वासनिक यांनी मार्गदर्शन केल्याचा उल्लेख बोंद्रे यांनी केला. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्याला भावाप्रमाणे प्रेम दिल्याचंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मात्र, आता राजकीय वाटचालीला वेगळं वळण देण्याचा निर्णय घेतल्याचं बोंद्रे यांनी स्पष्ट केलं आहे. भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्याचवेळी काँग्रेसमधील जुन्या सहकाऱ्यांना आपण कधीही विसरणार नसल्याचंही त्यांनी भावनिकपणे नमूद केलं आहे.
राहुल बोंद्रे यांच्या या निर्णयामुळे चिखलीच्या राजकारणात नवं समीकरण तयार होण्याची चर्चा सुरू झाली आहे. बोंद्रे हे यापूर्वी चिखली मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिले आहेत आणि बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळलं आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत चिखली मतदारसंघातून काँग्रेसकडून राहुल बोंद्रे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपच्या श्वेता महाले यांनी त्यांचा पराभव केला.
दरम्यान, बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला याआधीही उधाण आलं होतं. ऑगस्ट 2026 मध्ये त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत वृत्त प्रसिद्ध झालं होतं. आता मात्र बोंद्रे यांनी स्वतःच पक्षप्रवेशाचा निर्णय जाहीर केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
या घडामोडीमुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चिखलीसह जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजपची स्थानिक संघटना या बदलाकडे कशा पद्धतीने पाहते, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.






