‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांचा राहुल गांधींवर घणाघात
Modi Mimicry : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या मध्य प्रदेशातील इंदूर येथे झालेल्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावरून राजकीय वातावरण तापलं आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी शिक्षण व्यवस्था, पेपरफुटी, रोजगार आणि लोकशाही अशा विविध मुद्द्यांवर केंद्र सरकारला घेरलं. मात्र, कार्यक्रमातील नरेंद्र मोदी यांच्या मिमिक्रीमुळे वेगळाच वाद रंगला आहे.
राहुल गांधी मंचावर उपस्थित असताना स्टँडअप कॉमेडियन पुलकित मणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्याच्या आणि वागण्याच्या शैलीची मिमिक्री केली. यावरून सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून राहुल गांधींवर टीका केली जात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही या कार्यक्रमावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.
इंदूरमधील कार्यक्रमाबाबत बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी थेट नाराजी व्यक्त केली. “कालचा इंदूरचा कार्यक्रम हा बालिशपणाचा कार्यक्रम होता. यात मिमिक्री करणं हे सोपं आहे, पण यामधून काय साध्य होणार आहे? आपण देश वाढवण्यासाठी काम करतो की आखाडा चालवण्यासाठी काम करतो?” असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, महाराष्ट्रातील दुष्काळजन्य परिस्थितीवरही प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केलं. राज्यातील काही भागांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहिल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर सरकार बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकरी, पिण्याचं पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नावर सरकारकडून आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याशिवाय यूपीआयवरील सुधारित एमडीआर शुल्काच्या मुद्द्यावरही पटेलांनी प्रतिक्रिया दिली. मुंबईतील पेट्रोल पंप चालकांनी 2 हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या UPI व्यवहारांबाबत घेतलेल्या भूमिकेचा संदर्भ देत त्यांनी केंद्र सरकारने या विषयावर विचार करण्याची गरज असल्याचं सांगितलं.
यूपीआयवरील एमडीआरबाबत केंद्र सरकार संवेदनशील असून, काही अडचण असल्यास त्यात सुधारणा केली जाऊ शकते, असं पटेल यांनी नमूद केलं. त्यामुळे एका बाजूला राहुल गांधींच्या कार्यक्रमातील मिमिक्रीवरून राजकीय टोलेबाजी सुरू असतानाच, दुसऱ्या बाजूला दुष्काळ आणि UPI शुल्कासारख्या मुद्द्यांवरही प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.






