आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या निवडणुकीची सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे.अशातच राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) हे नेहमीच चर्चेत असतात. मंगळसूत्राने निवडणूकीची सूत्र हाती घेतल्याचे चित्र दिसून आले आहे. दोन दिवसांपासून देशासह राज्यात सौभाग्याचं लेणं निवडणुकीच्या केंद्रस्थानी आले आहे. याच मुद्द्यावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. राजस्थानच्या निवडणूक सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. काँग्रेस आई-बहिणींचे मंगळसूत्र पण शिल्लक ठेवणार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर देशभरात सगळीकडे अनेक चर्चा रंगल्या आहेत.
संजय राऊत काय म्हणाले?
नरेंद्र मोदी बायकांच्या मंगळसूत्रावर हात घालत आहेत. जो माणूस घरातल्या मंगळसूत्राची प्रतिष्ठा ठेऊ शकत नही त्यांनी इतरांची उठाठेव करु नये. मणिपूरला किती महिलांची मंगळसूत्र गेली, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.
राम मंदिराच्या आंदोलनात तुम्ही कुठे होता?
राम मंदिर उभारण्यासाठी अयोध्येत जेव्हा आंदोलन सुरु होत तेव्हा हे डरपोक कुठे होते, रामाच्या साहाय्याने हे निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. शेवटी त्यांची फडफड सुरु आहे. देशात हे आंदोलन चालू असताना शिवसेना या आंदोलनामध्ये उतरली होती. अमित शाहांच्या पक्षातील नेत्यांनी सांगितलं होत हे कृत्य शिवसेनेने केलं होत तेव्हा बाळासाहेबांनी त्याची जवाबदारी घेतली होती, तेव्हा अमित शाह तरी होते का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
अजित पवार, एकनाथ शिंदेंवर टीका
साखर कारखान्यांना निवडणुकीच्या आधी दिलेला निधी म्हणजे लाच, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. साखर कारखान्यांना निवडणुकीच्या आधीच कसा काय निधी दिली जातो. तसेच त्यांनी निवडणूक आयोगाला पण कटघऱ्यात उभे केले. आता कुठे आहे निवडणूक आयोग,असे देखील संजय राऊत म्हणाले. ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालानंतर एकनाथ शिंदे गट पूर्णपणे संपलेला असेल, त्यांचा एकही खासदार निवडून येणार नाही. अजित पवार आणि एकनाथ शिंदे संपलेले असतील, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर टीका केली आहे.