माळेगाव नगरपंचायतीमध्ये आला ट्विस्ट (फोटो- सोशल मीडिया)
नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत आला ट्विस्ट
अजित पवार आणि रंजनकुमार तावरे एकाच व्यासपीठावर
ऐतिहासिक मनोमिलनानं निवडणुकीच्या संपूर्ण समीकरणालाच कलाटणी
माळेगाव/प्रदीप जगदाळे: माळेगाव नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात अनपेक्षित वळण घेतलं आहे. तब्बल तीन दशके संघर्षात असणारे प्रदेशाचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माळेगाव साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे अखेर एकाच व्यासपीठावर आले आहेत. या ऐतिहासिक मनोमिलनानं माळेगाव निवडणुकीच्या संपूर्ण समीकरणालाच कलाटणी दिली आहे.गेल्या काही महिन्यांपासून तावरे–पवार गटातील मतभेद चव्हाट्यावर होते.
मात्र, पडद्यामागील चर्चेनंतर दोन्ही गटांनी ‘एकजूट’ दाखवत पुन्हा हात मिळवला आहे. आरोप–प्रत्यारोपांना पूर्णविराम मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये सुटकेचा निःश्वास आणि नव्या जोमाचा उत्साह दिसून येत आहे.निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मैदानात असताना या मनोमिलनानंतर राजकीय तापमान चांगलंच वाढलं आहे. नगराध्यक्षपदाची लढत अधिकच रंगात आली असून मतदारसंघात नवे राजकीय गणित मांडले जात आहे.
वडगावात भाजप-शिवसेना युतीची मोठी घोषणा! १४ उमेदवारांची घोषणा अन् महिला शक्तीला बळ
माहितीनुसार, अजित पवार गटाला नगराध्यक्षपदातील १० जागा तर तावरे गटाला ८ जागांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे मतांचे विभाजन टाळण्यासाठी दोन्ही गटप्रमुख आता रणनिती आखण्यास सज्ज झाले आहेत. दुसरीकडे, विरोधी गटातील काही उमेदवारांनीही या घडामोडीनंतर आपली उमेदवारी पुनर्विचारात घेतल्याची चर्चा आहे.
तीस–पस्तीस वर्षांचा राजकीय संघर्ष संपल्याने स्थानिक मतदार या बदलाला ऐतिहासिक क्षण म्हणून पाहत आहेत. “आज माळेगावच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली,” अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यांतून उमटत आहेत.दरम्यान, फॉर्म भरण्यापासूनच प्रचारात वेग आला असून गावागावात प्रचारसभा आणि चर्चांचा धडाका सुरू आहे. पवार–तावरे यांच्या एकत्रित शक्तीसमोर विरोधकांची समीकरणे कोसळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.एकूणच, माळेगाव नगरपंचायतीची निवडणूक आता राजकीय रंगात न्हाऊन निघाली असून पवार–तावरे यांच्या मनोमिलनामुळे या लढतीचं तापमान चांगलंच वाढलं आहे.






