मालवाहू वाहन उलटून भीषण अपघात; सहा जण गंभीर जखमी (संग्रहित फोटो)
यवतमाळ : आठवडी बाजारासाठी साहित्य घेऊन येत असलेल्या मालवाहू वाहनाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. हे वाहन घाटात उलटून दरीत कोसळले. यात वाहनातील सहाजण जखमी झाले असून, यात दोन महिलांचाही समावेश आहे. ही घटना यवतमाळच्या सावळी सदोबा ते बाजार मार्गावरील अकोला घाटावर घडली.
सुरेखा प्रकाश फुलमाळी (वय ५५, रा. पारवा), मंदा मोहण गभाने (वय ४५, रा. पारवा), नीलेश रमेश जाधव (वय ४०, रा. यवतमाळ), पृथ्वीराज सीताराम भवरे (वय ६०, रा. तळेगाव), प्रकाश महादेवराव फुलमाळी, अमोल विठ्ठलराव जगताप (वय ४५, रा. पारवा) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. सावळी सदोबा ते अकोला बाजार मार्गावरील घाटामध्ये वाहनावरील वाहकाचा नियंत्रण सुटल्याने मालवाहू वाहन उलटले. सदर वाहन रस्त्यावरून खाली घाटातील एका मोठ्या दरीत कोसळले.
यामध्ये वाहनातील व्यापारी मोठ्या प्रमाणात जखमी असून, या अपघातात सहाही व्यापारी सावळी सदोबा येथील आठवडी बाजारासाठी येत होते. या अपघातात जखमी झालेल्यामध्ये दोन महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठून अपघातातील जखमी व्यापाऱ्यांना तत्काळ उपचारासाठी सावळी सदोबा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
जखमींवर तातडीने वैद्यकीय उपचार
त्यानंतर सर्व जखमीवर डॉ. अभिजित बढीये यांनी प्राथमिक उपचार केले. अपघातातील जखमींची अवस्था गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले आहेत. या घटनेचा पुढील तपास सावळी सदोबा दूरक्षेत्राचे पीएसआय गजानन बाष्ठावाड करीत आहे.
नियंत्रण सुटून वाहन धडकले झाडाला
दुसऱ्या एका घटनेत, काही दिवसांपूर्वीच धान रोवणीच्या कामासाठी मजूर घेऊन जात असलेले वाहन नियंत्रण सुटून झाडावर आदळले. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला, तर 8 जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मासलमेटा गावाजवळ घडला. या अपघाताने जिल्ह्यातील बेजबाबदार मजूर वाहतुकीचा प्रकार समोर आला.