गंगापूर मार्गावर अपघात; एकाचा मृत्यू (संग्रहित फोटो)
गंगापूर : गंगापूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आंबेवाडी फाट्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. यातील जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली.
भागचंद दयाराम बैनाडे (वय ५५, रा. कोबापूर) यांचा मृत्यू झाला असून, सुरेश शांतीलाल चरांडे (वय ४०, रा. कोबापूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. भागचंद बैनाडे व सुरेश चरांडे हे दोघे मोटारसायकल (क्र. एमएच २० बीडब्ल्यू ५३६५) वरून गंगापूरहून कोबापूरकडे जात होते. सायंकाळी सुमारे साडेसहाच्या सुमारास आंबेवाडी फाट्यानजीक गंगापूरकडे येणाऱ्या ट्रक (क्र. एमएच ०४ एचवाय ३५६१) ने मोटारसायकलला समोरासमोर जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले.
दरम्यान, या अपघातानंतर ट्रकचालक ट्रक घटनास्थळी सोडून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे, रोहित शिंदे, नंदू सातपुते तसेच सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक शिरसाट यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल धाबे यांनी तपासणी करून भागचंद बैनाडे यांना मृत घोषित केले. तर गंभीर जखमी सुरेश चरांडे यांच्यावर डॉ. शेख नशित व मुन्ना भोसले यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविले.
ट्रकचालकाविरोधात पोलिसांत गुन्हा
या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या अपघातामुळे कोबापूर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुण्यातही अपघाताची घटना
दुसरीकडे, पुणे शहरात सातत्याने जड वाहनांचे अपघात होत आहेत. भरधाव वेगातील सिमेंट मिक्सरने दुचाकीस्वारासह दोघांना चिरडल्याची घटना घडली आहे. हा अपघात नेमका कसा झाला हे मात्र समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी सिमेंट मिक्सरच्या चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फुरसूंगीतील मंतरवाडी चौकातील शेल पेट्रोल पंपाजवळ घटना घडली आहे.