संग्रहित पोटो
कदमवाकवस्ती : पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर रिव्हरव्ह्यू सिटीने पाईपलाईनसाठी बेकायदा खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी घसरून दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गुरूवारी (दि. ७) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. अपघातात जखमी झालेल्या तरुणांमध्ये वेदांत सावंत आणि आदित्य सुरेश आटोळे (दोघेही पांडवदंड, कदमवाकवस्ती) यांचा समावेश आहे. आदित्यवर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे.
कडक कारवाई करण्याची मागणी
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, दोघेही दुचाकीवरून घरी जात असताना अचानक अंदाज न आल्याने १५ ते २० फूट खोल खड्ड्यात पडले. अपघातानंतर नागरिकांनी तात्काळ दोघांना रुग्णालयात दाखल केले. यामध्ये विशेषत: सेवा रस्त्यावर कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजना नव्हत्या, ज्यामुळे अपघाताची शक्यता अधिक वाढली होती. नवपरिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी रिव्हरव्ह्यू सिटीवर पूर्ण जबाबदारी टाकत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
गायकवाड म्हणाले की, “कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने पाईपलाईनसाठी शिवरस्त्याचा वापर करावा, अशी मागणी वारंवार केली होती. मात्र, रिव्हरव्ह्यू सिटीने सेवा रस्त्यावर अनधिकृतपणे काम केले. या अपघातातील सर्व खर्च दोषींनी उचलावा आणि पोलिसांनी जबाबदारांवर गुन्हा दाखल करावा.” त्यांनी असाही इशारा दिला की, जर सेवा रस्त्यावर काम सुरू ठेवले तर तीव्र आंदोलन होऊ शकते. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता पंकज प्रसाद यांना प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला असता फोन उचलला नाही. इंजिनिअर रोहन जगताप यांनी देखील प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
वाहनचालकांच्या जीवाला धोका
त्यांच्या म्हणण्यानुसार, “महामार्गाच्या मध्यापासून १५ मीटर बाहेरच काम करण्याची परवानगी असते; सेवा रस्त्यावर परवानगी नसते. जर अनधिकृत कामामुळे अपघात झाला तर दोषींवर गुन्हा दाखल होईल की नाही, हे वेळ सांगेल.”ग्रामपंचायतीच्या नागरिकांनी या प्रकरणाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे आणि भविष्यात अशा प्रकारच्या अनधिकृत कामांवर कडक कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. अपघातातून सुरक्षा उपायांची कमतरता स्पष्ट होते, तर रिव्हरव्ह्यू सिटीच्या बेकायदा कामामुळे वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.