औरंगाबाद : महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा फोडल्या प्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांनी महापालिकेला संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, महापालिकेचे सहायक आयुक्त विक्रम दराडे यांनी सोमवारी रात्री प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा फोडला व गोपनियतेचा भंग केल्याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात कंत्राटी संगणक चालक काझी हस्तीयाज सोहेल काजी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आमदार संजय शिरसाट यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रारीचे निवेदन दिले होेते.
महापालिका निवडणुकीच्या प्रारूप प्रभागरचना आराखड्याचे व नकाशे तयार करण्याचे काम सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून त्यामध्ये दुरुस्ती सुचविल्यामुळे मनपा अधिकारी-कर्मचारी प्रारूप प्रभागरचना आणि नकाशे विवरणपत्रात भरून सादर करण्यासाठी आणि लोकसंख्या व प्रगणक गट या मधील तफावत दूर करण्याच्या कामाकरिता मुंबईला निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गेले आहेत. याच दरम्यान, मनपाच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा शुक्रवारी फोडण्यात येऊन तो मोबाईलवरून व्हायरल करण्यात आला.
निवडणुकीच्या प्रभागरचनेचे परिशिष्ट २ ज्यामध्ये प्रभागाची व्याप्ती नमूद असते. ते शहरातील अनेक नागरिकांच्या मोबाईलवर आल्याने गोपनियतेचा भंग झाला. या संबंधीचे सविस्तर वृत्त सर्व वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाले होते. आमदार संजय शिरसाट यांनी या वृत्ताची दखल घेऊन सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांची भेट घेऊन त्यांच्याकडे प्रभागरचना फुटल्यामुळे गोपनीयतेचा भंग झाल्याची तक्रार वजा निवेदन सादर केले. राज्य निवडणूक आयोगाने २४ ऑक्टोबर २००५ आणि २ जुलै २०१३ प्रभागरचना तयार करताना गोपनीयतेचे पालन करण्यासंदर्भात ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याचे पालन केले गेले नाही.
तसेच, नवीन प्रभागरचना करत असताना निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करून अनेक नागरी कॉलनी आणि वस्त्यांचे विभाजन करण्यात आले आहे. ही सदोष प्रभागरचना रद्द करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार संजय शिरसाट यांनी मुख्य निवडणूक आयुक्त मदान यांच्याकडे केली होती. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांनी प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा फोडल्याने व गोपनियतेचा भंग केल्यामुळे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांना दिले.
गोपनियतेचा भंग केल्याबद्दल तक्रार
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या आदेशावरुन मनपा प्रशासनातील आस्थापना विभागाचे सहायक आयुक्त विक्रम दराडे यांनी सोमवारी रात्री सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीत म्हटले की, महापालिकेच्या कार्यालयात कंत्राटी संगणक चालक काझी हस्तीयाज सोहेल काझी याने २० ते २८ मे दरम्यान त्याच्या ताब्यात व कब्जात असलेले शासकीय निवडणूकीचे गोपनिय दस्तऐवज हे प्रसार माध्यमे व सोशल मिडीयावर व्हायरल झाले. यावरुन काझी हस्तीयाज सोहेल काझी याने निवडणूकीबाबत प्रभाग रचनेशी संबंधीत कच्ची व प्राथमिक माहिती व्हायरल केली, असे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यामुळे त्याच्यावर कलम ४०९ भादविसह शासकीय गुपीते अधिनियम सन १९२३ चे कलम ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
@Sanjay Shirsat@OfficeSS